Ichalkaranji Politics : निमित्त दिवाळी शुभेच्छा, कोल्हापूरचे दादा, इचलकरंजीच्या आण्णांना भेटले; मिशन झेडपी ते महापालिका काय झाली चर्चा...
esakal October 21, 2025 04:45 PM

Ichalkaranji BJP Political News : इचलकरंजी महापालिका निवडणूकीसाठी महायुती केली जाणार असून भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे आज स्पष्ट केले. सुरेश हाळवणकर यांची विधान परिषदेवरील नियुक्ती पहाटेच्या शपथविधीसारखी अचानक होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री पाटील यांनी आज आमदार राहूल आवाडे व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष हाळवणकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अशोक स्वामी, तानाजी पोवार, अजीत जाधव, मनोज हिंगमीरे, दिलीप मुथा, युवराज माळी, जहाँगीर पटेकरी, मारुती पाथरवट, उमाकांत दाभोळे आदी उपस्थीत होते.

आगामी महापालिका निवडणूकीबाबत विचारले असता मंत्री पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या महायुती म्हणून लढविणार आहोत. पण संपू्र्ण महाराष्ट्रात एक युती होणार नाही. कांही ठिकाणी शहर पातळीवर महायुतीचा निर्णय होईल. तर कांही ठिकाणी अगदी प्रभाग पातळीपर्यंत तडजोडी केल्या जातील. यातून सत्ता कशी येईल, हे पाहिले जाणार आहे. पण महापौर व प्रभाग आरक्षण पडल्याशिवाय याबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होणार नाही.

Prakash Awade : 'किती दर देणार ते सांगत नाही पण एकरकमी पैसे देणार', प्रकाश आवाडेंचा शब्द; शेतकऱ्यांना AI चे मार्गदर्शन करणार...

माजी आमदार हाळवणकर यांच्या पूर्नवसनाबाबत ते म्हणाले, विधान परिषदेवर त्यांना पक्षाकडून लवकरच संधी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. राज्यपाल नियुक्तीच्या कोट्यात भाजपच्या तीन जागा शिल्लक आहेत. या शिवाय विधान परिषदेच्या आणखी कांही जागा रिकाम्या आहेत. यातील पहिल्या यादीत हाळवणकर यांचे नाव असणार आहे. त्यामुळे त्यांची विधान परिषदेवरील नियुक्ती ही पहाटेच्या शपथविधीसारखी अचानक होईल. तसेच आवाडे - हाळवणकर एकत्र आल्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही.

दरम्यान, आमदार आवाडे यांच्या निवासस्थानी मंत्री पाटील यांनी भेट दिली. यावेळी पक्ष संघटन वाढविण्यासह विविध विषयांवर चर्चा झाली. मतदार याद्यांबाबतच्या वादाबाबत विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी नमूद केले. राहूल आवाडे व प्रकाश आवाडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रकाश दत्तवाडे उपस्थीत होते. भाजपचे माजी शहराध्यक्ष धोंडीराम जावळे व पांडुरंग म्हातुकडे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्याही निवासस्थानी मंत्री पाटील यांनी यावेळी भेट दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.