भेटवस्तूंनी उजळली सासवडकरांची दिवाळी
esakal October 22, 2025 01:45 AM

सासवड, ता. २१: नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय उकळी चढली आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांनी दिवाळीच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा सपाटा लावला. चॉकलेटपासून दिव्यांपर्यंत भेटवस्तूंचा ओघच सुरू झाला असून, सासवडकरांची यंदाची दिवाळी ‘राजकीय भेटवस्तूंनी’ उजळली आहे.
आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत आपली छाप उमटवण्यासाठी इच्छुकांनी दिवाळीचे निमित्त साधले आहे. नगर परिषदेवर गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळ प्रशासकीय राजवट असल्याने यंदा उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे. याच निवडणूक वातावरणाचा थेट परिणाम दिवाळी सणावर झाला असून, यंदाची दिवाळी सासवडच्या नागरिकांसाठी काहीशी ‘बरी’ ठरल्याचे चित्र आहे.
निवडणुकीपूर्वी दिवाळी सण आल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक इच्छुकांनी दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी भेटवस्तू वाटल्या आहेत. यामुळे मतदारांना अनेकदा एकाच वस्तूचे विविध ‘वर्जन’ मिळाल्याचे बोलले जात आहे. इच्छुकांनी केलेली ही भेटवस्तूंची देवाणघेवाण मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक माध्यम बनली असून, त्यामुळे मतदारांची दिवाळी यंदा चांगली झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर उमेदवारीसाठी इच्छुकांचा जणू ‘महापूर’ आला आहे. आपली राजकीय महत्त्वाकांक्षा मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी इच्छुकांनी सध्या फ्लेक्स आणि बॅनरबाजीचा अतिरेक केला आहे. मात्र, यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सासवड नगरपरिषदेच्या इमारतीसमोर मोठमोठे बॅनर लागले नसल्याने पालिकेची प्रशस्त आणि सुंदर इमारत आता रस्त्यावरूनही दिसत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.