तुमचा शॉवर हेड आणि त्याला जोडलेले पाईप्स म्हणजे बॅक्टेरिया आणि बुरशींसाठी एक सुरक्षित जागा असते. पण काही अगदी सोप्या उपायांनी हे बॅक्टेरिया नष्ट करता येतात.
आपल्याला स्वच्छ अंघोळ करायची असते म्हणून आपण शॉवर घेतो. गरमागरम पाणी, वाफ आणि साबण यामुळे आपल्याला ताजंतवानं वाटतं. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण शॉवर सुरू करतो, तेव्हा बॅक्टेरियाचा एक फवाराच आपल्या चेहऱ्यावर मारला जातो.
तुमच्या घरातील पाईपांच्या शेवटच्या एक मीटर भागात एक छोटी इकोसिस्टिम म्हणजे जैविक जग लपलेलं असतं, ते तुमचं शॉवर चालू होण्याची वाट पाहत असतं.
म्हणजेच सकाळी शॉवर चालू करताना पहिल्या फवाऱ्यात फक्त पाणी आणि वाफ नसते तर त्यात असतो रात्रीतून तयार झालेला शॉवर पाईप आणि हेडमधील बॅक्टेरियाचा एक थर.
हे बॅक्टेरिया पाण्याच्या थेंबांवर बसून तुमच्यापर्यंत पोहोचतात. यातील बहुतांश बॅक्टेरिया साधे आणि निरुपद्रवी असतात.
पण शॉवरच्या पाईपचा प्रकार आणि शॉवर किती वेळा घेतला जातो यावर बॅक्टेरियाचा प्रकार ठरतो आणि इथूनच काही धक्कादायक गोष्टी समोर येतात.
शॉवर हेड आणि पाईप ही बॅक्टेरियासाठी अगदी सोईस्कर जागा असते. शॉवर घेतल्यानंतर पाईप अनेक तास गरम, ओलसर राहतात, तिथे हालचाल नसते. त्यांचा लांबट आणि अरुंद आकार बॅक्टेरियांना चिकटून राहण्यासाठी योग्य असतो.
हे बॅक्टेरिया पाण्यातील पोषणद्रव्यांवर आणि प्लास्टिकमधून बाहेर पडणाऱ्या कार्बनवर जगतात. जर ही अवस्था रात्रभर तशीच राहिली, तर बॅक्टेरियांची संख्या झपाट्याने वाढते.
हे बॅक्टेरिया बायोफिल्म तयार करतात म्हणजेच चिकट आणि सूक्ष्म बॅक्टेरियांची 'शहरं' जी ओलसर पृष्ठभागावर चिकटतात, जसे की जहाजांचे तळ किंवा दातांवरील पातळ थर. जेव्हा तुम्ही शॉवर सुरू करता, तेव्हा या बायोफिल्मचे तुकडे होऊन बॅक्टेरिया पाण्याच्या फवाऱ्यात मिसळतात.
पण हे बॅक्टेरिया किती असतात? प्रयोगशाळांमध्ये आणि घरांमध्ये केलेल्या चाचण्यांमध्ये असं आढळून आलं की शॉवरच्या पाईपांवर प्रत्येक चौरस सेंटीमीटरमध्ये तब्बल लाखो ते कोटी बॅक्टेरिया असू शकतात.
यातील बहुतांश निरुपद्रवी असतात, पण काही मायकोबॅक्टेरिया प्रकारातले असतात जे मातीमध्ये आढळतात आणि बॅक्टेरियाचे काही प्रकार क्षयरोग आणि कुष्ठरोगासारख्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात.
ब्रिटनमधील घरांमध्ये घेतलेल्या नमुन्यांमध्ये काही बुरशींचे डीएनएही सापडले जसे की Exophiala, Fusarium आणि Malassezia हे आपल्या त्वचेवर आणि मातीमध्ये आढळतात, पण काही वेळा संसर्गही करू शकतात.
कुणासाठी अधिक धोका?हे बॅक्टेरिया कायम एकसारखे नसतात ते वेळेनुसार बदलतात. चीनमधील एका अभ्यासात 48 शॉवर युनिट्सचे निरीक्षण केले असता असे आढळले की शॉवरच्या पाईपमध्ये 4 आठवड्यांनंतर बायोफिल्म सर्वाधिक प्रमाणात तयार होते. नंतर ती कमी होते, कारण ती पाईपमध्ये घट्ट चिकटलेली नसते. पण 22 आठवड्यांनंतर ती पुन्हा वाढते.
काळजीची गोष्ट म्हणजे, केवळ 4 आठवड्यांनंतर त्यात Legionella pneumophila नावाचा जीवाणू सापडला जो Legionnaire's रोगाला कारणीभूत ठरतो.
बहुतेक लोकांसाठी शॉवरमधून संसर्ग होण्याचा धोका कमी असतो, विशेषतः जर शॉवर नियमित वापरात असेल.
स्वित्झर्लंडमधील स्वीस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ अक्वॅटिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ फ्रेडरिक हॅम्स, सांगतात की, "फक्त Legionella आणि इतर रोग कारक सूक्ष्मजीव दूषित शॉवरचा धोका निर्माण करतात."
जर शॉवर L. pneumophila (लेजायोनेला न्यूमोफिला) ने दूषित असेल, तर संसर्गाचा धोका जास्त असतो, कारण वापरकर्ता शॉवरच्या फवाऱ्याच्या अगदी जवळ असतो. पण ते पुढे सांगतात की, हा धोका मुख्यतः रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या लोकांसाठी अधिक असतो.
म्हणूनच रुग्णालयांमध्ये शॉवर हेड्सचे निर्जंतुकीकरण आणि बदलण्याचे नियम अधिक कडक असतात. हे तुमच्या राहण्याच्या ठिकाणावरही अवलंबून असते.
अमेरिकेतील एका अभ्यासात असे आढळले की ज्या भागांमध्ये शॉवर हेड्समध्ये अधिक रोगकारक मायकोबॅक्टेरिया होते, तिथे non-tuberculous mycobacteria (NTM) फुफ्फुसाच्या आजारांचे प्रमाणही जास्त होते.
हवाई, फ्लोरिडा, दक्षिण कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्कसह उत्तर-पूर्व भाग हे हॉटस्पॉट होते. काही भागांमध्ये हवामान आणि पाण्यातील क्लोरीनचे प्रमाणही यामध्ये कारणीभूत ठरतात.
उष्ण हवामान आणि क्लोरीनच्या अधिक प्रमाणामुळे काही रोगकारक मायकोबॅक्टेरिया वाढतात.
तुमच्या शॉवरमधील बॅक्टेरियांचा प्रकार पाण्याच्या स्रोतावरही अवलंबून असतो. ज्या घरांमध्ये क्लोरीनयुक्त पाणी पुरवले जाते, तिथे मायकोबॅक्टेरियाचे प्रमाण अधिक असते, तर विहिरीचे पाणी किंवा नॉन-क्लोरीनयुक्त पाणी वापरणाऱ्या घरांमध्ये हे प्रमाण कमी असते जसे की नेदरलँड्समध्ये. कारण क्लोरीनला सहन करणारे बॅक्टेरिया अशा ठिकाणी अधिक वाढतात.
सुदैवाने, काही सोपे उपाय करून तुम्ही शॉवरमधील जिवाणूंचा धोका कमी करू शकता.
शॉवर हेड आणि पाईपचे मटेरियलसर्वात आधी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की शॉवर हेड आणि पाईप कशापासून बनले आहेत, यावर तिथे किती आणि कोणत्या प्रकारचे बॅक्टेरिया वाढतील हे ठरतं.
एका अभ्यासात संशोधकांनी दोन "शॉवर सिम्युलेटर" तयार केले आणि आठ महिने दररोज त्यांची चाचणी घेतली. एक पाईप PVC-P या लवचिक प्रकारच्या प्लास्टिकचा होता, तर दुसरा PE-Xc या दुसऱ्या प्रकारच्या प्लास्टिकचा होता.
आठ महिन्यांनंतर दोन्ही पाईपमध्ये चिकट बायोफिल्म तयार झाली होती, पण PVC-P पाईपमध्ये 100 पट अधिक बॅक्टेरिया होते.
हे असं का होतं? कारण काही पाईप बायोफिल्मला पोषक असतात. PVC-P पाईपमधून PE-Xc पेक्षा अधिक कार्बन पाण्यात मिसळतो, विशेषतः पाईप नवीन असताना.
हा कार्बन बॅक्टेरियासाठी अन्न म्हणून काम करतो आणि बायोफिल्म तयार होण्यासाठी योग्य पृष्ठभागही देतो.
स्टेनलेस स्टील किंवा क्रोम प्लेटेड ब्रासचा साधा धातूचा शॉवर हेड आणि PE-X किंवा PTFE लाईनर असलेला छोटा पाईप वापरल्यास बायोफिल्म तयार होणं कठीण होतं. पण अनेक छिद्र असलेले किंवा जास्त लवचिक डिझाइनचे शॉवर हेड्स पाण्याला अडकवून ठेवतात त्यामुळे पाईपमधून धातूंचे अंश जमा होतात, ज्यामुळे बॅक्टेरियाची वाढ होते.
पर्यावरणपूरक शॉवर हेड्स, जसे की कमी पाण्याचा वापर करणारे किंवा 'रेनफॉल' प्रकारचे, हे देखील तुमच्या श्वासात जाणाऱ्या थेंबांची संख्या आणि आकार बदलून तुमचा संपर्क बदलू शकतात.
हॅम्स सांगतात, "स्प्रे पॅटर्न महत्त्वाचा आहे, कारण मिस्ट मोडमध्ये पाच पट अधिक बारीक थेंब तयार होतात."
तुम्ही 'अँटिमायक्रोबियल शॉवर हेड्स' विकत घेऊ शकता जे फिल्टर किंवा सिल्व्हरसारख्या धातूंचा वापर करून बॅक्टेरिया कमी करतात असं सांगतात, पण संशोधनानुसार या उत्पादनाचा फारसा फरक पडत नाही.
हॅम्स सांगतात, "एकदा बायोफिल्म किंवा मिनरल स्केल तयार झालं की त्याचा परिणाम लगेच कमी होतो. एकमेव प्रभावी उपाय म्हणजे इन-लाइन शॉवर फिल्टर पण हे महाग असतात आणि चांगल्या पाण्याच्या दाबाची गरज असते."
चाचण्यांमध्ये, अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्सबर्ग विद्यापीठातील पर्यावरण अभियांत्रिकी आणि सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या सहयोगी प्राध्यापक सारा-जेन हॅग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिले की, 'अँटिमायक्रोबियल' (जंतुनाशक) शॉवरहेड्सनी पारंपरिक मॉडेल्सच्या तुलनेत पाण्यातील सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी केले नाही.
त्याऐवजी, त्यांनी फक्त तेथे उपस्थित सूक्ष्मजीवांच्या प्रकारांमध्ये बदल केला कारण प्रत्यक्ष शॉवरमध्ये संपर्काचा कालावधी खूपच कमी असतो आणि कधी कधी सक्रिय जंतुनाशक घटकाचे प्रमाणही प्रभावीपणे निर्जंतुकीकरण करण्याइतके नसते.
ती अशा शॉवरहेड्सचा वापर टाळण्याचा सल्ला देते जे 'आरोग्यवर्धक' दावे करतात, म्हणजे पाण्यात पोषकद्रव्ये मिसळतात किंवा क्लोरीन फिल्टर करतात. कारण असे शॉवरहेड्स पाण्यातील सूक्ष्मजीवांच्या संतुलनात (मायक्रोबायोममध्ये) अवांछित बदल घडवू शकतात.
साधे उपाय जे प्रभावी ठरतातपाण्याचे तापमानही महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या तापमानांवर आणि शॉवरहेडच्या प्रकारांवर केलेल्या चाचण्यांमध्ये असं दिसून आलं की, गरम पाणी शॉवर चालू केल्यानंतर पहिल्या 1-2 मिनिटांत सर्वात जास्त बारीक थेंब तयार करतं जे श्वासात जाऊ शकतात.
म्हणूनच तुम्ही गरम नळ चालू करता तेव्हा शॉवरमधील बॅक्टेरियाचा धोका सर्वाधिक असतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही थेट थंड पाण्याने अंघोळ करायला हवी.
त्याऐवजी, शॉवर चालू करताना थेट फवाऱ्याखाली उभं राहण्याऐवजी 60 ते 90 सेकंद शॉवर चालू ठेवा आणि मग अंघोळ सुरू करा.
यामुळे पाईपमधील जिवाणू बाहेर पडतात. हे विशेषतः सुट्टीवरून परत आल्यावर किंवा शॉवर बराच काळ वापरला नसेल तेव्हा करणे उपयुक्त ठरते.
Legionella जिवाणू 20-45°C तापमानात वाढतात, पण 50°C पेक्षा जास्त तापमानात मरतात, विशेषतः 60°C वर. जर तुमच्या घरात गरम पाणी टाकीमध्ये साठवले जाते, तर ते 60°C ठेवावे आणि नंतर थर्मोस्टॅटिक मिक्सिंग व्हॉल्वने शॉवरचे तापमान आरामदायक ठेवावे.
48°C पेक्षा जास्त तापमानात अंघोळ करणे टाळा, कारण त्यामुळे त्वचा भाजण्याचा धोका असतो. हॅम्स यांच्या अभ्यासात 45°C तापमान पुरेसे असल्याचे आढळले.
हॅम्स यांच्या मते, गरम पाण्याच्या शॉवरमध्ये साधारण दोन मिनिटांच्या आत हवेत उडणाऱ्या अशा अतिसूक्ष्म थेंबांची संख्या सगळ्यात जास्त होते.
हे थेंब सूक्ष्मजीवांना हवेत उचलून नेऊ शकतात आणि श्वासातून शरीरात जाऊ शकतात. शॉवर बंद केल्यानंतरही हे थेंब किमान पाच मिनिटांपर्यंत हवेत टिकून राहू शकतात.
एका अभ्यासात असंही सुचवण्यात आलं की, अंघोळीनंतर बाथरूम वाळवल्याने जिवाणूंच्या थेंबांचे प्रमाण कमी करू शकते.
हॅग सांगतात की, "आमच्या प्रयोगशाळेत आम्ही पाहिलं की 5 मायक्रॉनपेक्षा लहान कण शॉवर बंद केल्यानंतर किमान एक तास हवेत राहू शकतात. जर एक्स्ट्रॅक्टर फॅन चालू असेल, तर हे कण लक्षणीयरीत्या कमी होतात."
"मी आणि माझं कुटुंब 1.8 गॅलन (6.8 लिटर) प्रति मिनिट स्प्रे शॉवर हेड वापरतो.तसं हेकाही विशेष नाही. आम्ही नेहमी फॅन चालू ठेवतो आणि पाणी आणि फॅन काही मिनिटं चालू ठेवल्यानंतरच अंघोळ करतो."
शॉवर किती वेळा वापरला जातो यावरही जिवाणूंची वाढ अवलंबून असते. शॉवर जितका जास्त वापरला जातो, तितकी पाईप्समध्ये पाणी अडकण्याची शक्यता कमी होते आणि त्यामुळे बायोफिल्म कमी तयार होते.
हॅम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनानुसार, जिथं पाणी साचलेलं असतं विशेषतः शॉवरच्या हेडमध्ये सूक्ष्मजीव सगळ्यात जास्त वाढतात.
महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन शॉवर पाईप नेहमीच चांगला उपाय नसतो. नवीन पाईपमध्ये जिवाणू सैल चिकटलेले असतात आणि पहिल्या फवाऱ्यात सहज बाहेर पडतात.
हॅम्स यांच्या संशोधनात असं आढळलं की, शॉवर चालू करताना 62% जिवाणू चार आठवड्यांच्या जुन्या पाईपमधून बाहेर पडतात. पण 40 आठवड्यांनंतर हे प्रमाण फक्त 1.5% होते, कारण बायोफिल्म अधिक घट्ट चिकटलेली असते.
यानंतर मात्र बायोफिल्म पुन्हा वाढते, पण ती इतकी घट्ट चिकटलेली असते की दरवेळी पाणी सोडल्यावर फार कमी प्रमाणातच ती धुऊन बाहेर पडते.
नियमित देखभाल हा सर्वोत्तम उपाय आहेशॉवरमध्ये गरम पाणी चालवून स्वच्छ करणे किंवा लिंबाच्या रसात भिजवणे हे बॅक्टेरियाची वाढ थांबवण्यासाठी उपयुक्त आहे.
जर घरात कोणाची रोगप्रतिकार क्षमता कमी असेल, तर दरवर्षी शॉवर हेड आणि पाईप बदलणे अधिक चांगले ठरते, महागड्या "अँटीमायक्रोबियल" पर्यायांवर अवलंबून राहण्याऐवजी.
रुग्णालयं आणि केअर सेंटरसाठी, जिथे धोका अधिक असतो, तिथे UK मधील NHS आणि US मधील CDC यांचे मार्गदर्शन शॉवर डिझाइन आणि देखभालीसाठी अधिक कठोर असते.
पाण्याच्या पुरवठ्याचे दुय्यम निर्जंतुकीकरणही महत्त्वाचे ठरते.
जर शॉवरमधील हे बॅक्टेरिया तुम्हाला त्रासदायक वाटत असतील, तर त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहा. तुमचा शॉवर घाणेरडा नाही, तर त्यामध्ये एक इकोसिस्टिम आहे जी तुम्ही नळ चालू करता तेव्हा तुमचं स्वागत करते.
तुम्ही त्यांना पूर्णपणे हटवू शकत नाही त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेणं हेच अधिक शहाणपणाचं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)