पालघर, ता. २१ : जिल्ह्यातील बाराशे कंत्राटी शिक्षकांचे पगार गेल्या चार महिन्यांपासून थकले होते. दिवाळी तोंडावर असताना पगार नसल्याने शिक्षकांची अवस्था वाईट बनली होती. आता राज्य सरकारने पगारापोटी नऊ कोटींच्या जवळपासचा निधी मंजूर आणि वर्ग केला असला तरी सरकारी सुट्ट्यांमुळे शिक्षकांना पगार मिळणार नाही. त्यामुळे यंदा बाराशे शिक्षकांच्या घरची दिवाळी कोरडी आणि कर्जबाजारीची होणार आहे. दिवाळीनंतर हे पगार मिळणार असल्याने एकीकडे दिलासा मिळाला असला तरी वेळेत पगार न मिळाल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे सूर आहेत.
पालघर जिल्हा परिषदेच्या तब्बल बाराशे कंत्राटी भाषा शिक्षकांना जून ते सप्टेंबरपर्यंत पगारापोटी तब्बल नऊ कोटी ४० लाखांचा निधी राज्य सरकारकडून वारंवार मागणी करूनही मिळालेला नव्हता. यातील काही शिक्षक १६ हजार रुपये प्रति महिना, तर सेवानिवृत्त प्रवर्गातील काही शिक्षक २० हजार रुपये प्रति महिना काम करत आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन सुरू आहे, मात्र कंत्राटी शिक्षकांना पगारावर अवलंबून राहावे लागत असल्याने सध्या त्यांची अवस्था बिकट आहे.
अलीकडे राज्य सरकारकडून एक कोटी ६१ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातील काही तुटपुंजा निधी शिक्षकांना वाटप करण्यात आला, मात्र दिवाळीच्या खर्चासाठी हा निधी अत्यल्प असल्यामुळे शिक्षकांसमोर घर खर्चाचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
दिवाळीनंतरच वेतन!
धनत्रयोदशीच्या दिवशी या शिक्षकांचा पाच महिन्यांचा पगार निधी राज्य सरकारकडून प्राप्त झाला आहे. दिवाळीच्या सरकारी सुट्टीमुळे हा पगार त्यांना मिळालेला नाही, मात्र दिवाळीनंतर हा पगार दिला जाणार आहे, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.