खांबाळेत आकाशकंदिल स्टॉल लक्षवेधी
esakal October 22, 2025 01:45 AM

swt219.jpg
99955
खांबाळेः खाद्य महोत्सवात केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले रंगीबेरंगी आकाशकंदील.

आकाशकंदिल स्टॉल खांबाळेत लक्षवेधी
खाद्य महोत्सवात पसंतीः केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २१ः खांबाळे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या दिवाळी खाद्य महोत्सवात केंद्रशाळा खांबाळेचा पर्यावरणपूरक रंगीबेरंगी आकाशकंदिलाचा स्टॉल लक्षवेधी ठरला. ग्रामस्थांनी या कंदील खरेदीला पसंती दिली.
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामंपचायत खांबाळे आणि सहेली ग्रामसंघाच्या वतीने दिवाळी खाद्य महोत्सवाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात करण्यात आले होते. महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, या हेतूने आयोजित केलेल्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्याच्या विविध भागातील ग्राहकांनी येथे येऊन दिवाळीचा फराळ खरेदी केला. बचतगटांची उलाढाल देखील चांगली झाली. खाद्य महोत्सवात केंद्रशाळा खांबाळेचा पर्यावरणपूरक आकाश कंदिलांचा स्टॉल लक्षवेधी ठरला. रंगीबेरंगी आणि आकर्षक कंदील हे आकर्षण ठरले. गावातील ग्रामस्थांनी या कंदिलांना पसंती देत खरेदी केली.
या स्टॉलला तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, पणन महामंडळाचे संचालक प्रमोद रावराणे, जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी या स्टॉलला भेट देत खरेदी केली. तहसीलदार पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सुटीत पुस्तके वाचण्याचा मोलाचा सल्ला दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.