लासलगाव: दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या काळात नेहमीच मोठी मागणी असलेल्या झेंडू फुलांना यंदा अपेक्षित बाजारभाव मिळालेला नाही. ‘पिवळे सोने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेंडूच्या फुलांना केवळ २० ते २२ रुपये प्रतिकिलो इतकाच दर मिळत असून, यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी निराशेच्या छायेत गेली आहे.
लासलगावजवळील टाकळी (विंचूर) येथील शेतकरी भागीरथ पर्वत शिंदे यांनी कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतीत नवा प्रयोग करत १५ गुंठ्यांत झेंडूची लागवड केली. जवळपास ३० हजार रुपये खर्च करत झेंडू फुलांचे उत्पादन घेतले.
दसऱ्याला झेंडूला १५ ते २० रुपये किलो भाव मिळाला. मात्र दिवाळीत दर वाढून ५०-६० रुपये किलो मिळतील, अशी शिंदे यांची आशा होती. मात्र, बाजारात उत्पादन अधिक आणि मागणी कमी असल्याने व्यापारी सध्या फक्त २०-२२ रुपये किलो इतकाच भाव देत आहेत.
परिणामी, उत्पादन खर्चही भरून निघेल की नाही, ही शंका निर्माण झाली असून, मेहनत, खर्च आणि अपेक्षा सर्व व्यर्थ गेल्याची खंत शिंदे यांनी व्यक्त केली. या परिस्थितीमुळे फुलशेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही अस्वस्थता आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Diwali Lakshmi Puja Coin Ritual: लक्ष्मीपूजनात नाण्यांची पूजा का आवश्यक मानली जाते? जाणून घ्या श्रद्धा आणि विज्ञानदोन वर्षांपासून कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने झेंडूची लागवड केली. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात झेंडूला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. पण व्यापाऱ्यांकडून केवळ २०-२२ रुपये किलो दर दिला जातोय. तीस हजार रुपयांचा खर्च करून १५ गुंठ्यांत झेंडूची शेती केली, पण आता उत्पादन खर्चही निघत नाही. मेहनत, वेळ आणि पैसा सर्व वाया गेला.
-भगीरथ शिंदे, फूल उत्पादक शेतकरी, टाकळी विंचूर