‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ आणि ‘फसक्लास दाभाडे’ या यशस्वी चित्रपटांनंतर निर्माती क्षिती जोग आणि लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे या लोकप्रिय जोडीचा आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून एक महत्त्वाचा सामाजिक विषय हाताळण्यात आला आहे. क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. येत्या १ जानेवारी २०२६ पासून हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटातून मराठी शाळांची घटती संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे अनमोल महत्त्व आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात मराठी भाषेबद्दल असलेला गर्व या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करण्यात येणार आहे. हा विषय मनोरंजक पद्धतीने, पण तितक्याच हृदयस्पर्शीपणे मांडण्यात आला आहे. नुकतंच या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना वंदन करण्यात आले आहे. या चित्रपटात क्रांतीज्योती विद्यालय दाखवण्यात आले आहे. यावेळी काही विद्यार्थी हे मजामस्ती करताना दिसत आहे. तसेच त्यांचे शिक्षकही त्यांच्यासोबत दिसत आहेत. हे सर्व विद्यार्थी पुन्हा शाळा सुरु होणार म्हणून फारच आनंदी आहेत.
View this post on Instagram
A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)
या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत. अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर अशी कलाकारांची दमदार फळी यात झळकणार आहे. विशेष म्हणजे, प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता कोळी या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
“मराठी शाळा हा विषय माझ्या अगदी मनाजवळचा आहे. याच शाळांमधून अनेक पिढ्या घडल्या आणि नामवंत व्यक्तिमत्त्वे तयार झाली. आज मराठी शाळांचे महत्त्व कमी होत चालले आहे, ही चिंताजनक बाब आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय’मधून आम्ही मनोरंजनाच्या माध्यमातून या विषयावर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचा आनंद आहे आणि माझ्या पूर्वीच्या चित्रपटांप्रमाणेच यावरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतील, अशी खात्री आहे, अशी माहिती लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी दिली. क्षिती जोग यांच्या ‘चलचित्र मंडळी’ निर्मित हा चित्रपट नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.