Kolhapur Crime News : वाहनांचे नंबर प्लेट आणि स्टिकर बदलून महिलांची रेकी करून दागिने चोरायचे, पण पोलिसांनी करेक्ट कार्यक्रम केला
esakal October 22, 2025 06:45 AM

Kolhapur Crime : वाहनांच्या नंबर प्लेट आणि स्टिकर बदलून महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक झाली. इम्रान समसुद्दीन मोमीन (वय ३८, रा. बेघर वसाहत हेर्ले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि सुदाम हणमंत कुंभार (वय ४०, रा. आंधळी, ता. पलूस, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्याची दोन मंगळसूत्रे, मोटार व इतर साहित्य असा सुमारे नऊ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर ते सांगली फाटा दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून जबरी चोरीचे दोन, मोटारसायकल चोरीचा एक असे तीन गुन्हे उघडकीस आले.

पोलिसांनी सांगितले, बेकरी, किराणा दुकानात असणाऱ्या महिलांना लक्ष्य करून दोन अनोळखी तरुण चारचाकी व दुचाकी वाहनावर वेगवेगळे नंबर तसेच स्टीकर लावतात. दुकानातून महिलांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरतात. याची नोंद गोकुळ शिरगाव व शिरोळ पोलिस ठाण्यात झाली.

सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासली. संशयित कोल्हापूर ते सांगली फाटा दरम्यान महामार्गावर येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. तेथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. तपासात पंधरा दिवसांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानक येथून मोटारसायकल चोरल्याचे दिसून आले. त्याच्याकडून २२ ग्रॅमचे दागिने, मोटारसायकल, गुन्ह्यासाठी वापरलेली मोटार आणि एक मोटार सायकल इतर साहित्य असा एकूण नऊ लाख १६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Kolhapur Killing Mystery : कोल्हापुरातील 'त्या' दोघांचा बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू नाहीचं, वृद्ध दांपत्याच्या मृत्यूचे गूढ वाढले

अंमलदार प्रवीण पाटील, सुरेश पाटील, हिंदुराव केसरे, रुपेश माने, दीपक घोरपडे, संजय पडवळ, अमित सर्जे, संतोष बरगे, रामचंद्र कोळी व सुशील पाटील यांचा पथकात समावेश होता.

रेकी करून चोऱ्या

कुठं सीसीटीव्ही आहे, कुठं नाही याची रेकी करून दोघांनी चोरी केली आहे. आजपर्यंत त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे त्यांना शोधणे कठीण झाले होते, मात्र पोलिसांना तांत्रिकदृष्ट्या मिळालेल्या माहितीनुसार ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.