मतदारांच्या घरात; 'जाऊबाई' जोरात
esakal October 22, 2025 02:45 PM

महापालिका निवडणूक ः लोगो

पीतांबर लोहार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २१ : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे. शिवाय, खुल्या जागांवरही त्यांना निवडणूक लढवता येणार आहे. आगामी तीन महिन्यांत पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक होणार आहे. त्याच्या प्रचाराचा मुहूर्त दिवाळीच्या निमित्ताने महिलांनी साधला आहे. आपल्या प्रभागातील घरोघरी जाऊन दिवाळी फराळ देण्याबरोबरच भेटवस्तू, मिठाई आणि शुभेच्छांचा वर्षाव मतदारांवर केला जात आहे. त्यासाठी शुभेच्छा पत्रावर स्वतःचा परिचय, पक्ष आणि चिन्हही छापली आहेत.
कोविड प्रतिबंधक नियम, तत्कालीन बदलती राजकीय समीकरणे आणि इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा आदी कारणांमुळे नियोजित वेळेत महापालिका निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे २०१७ मध्ये निवडणूक आलेल्या पदाधिकाऱ्यांची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली. परिणामी, राज्य सरकारने महापालिका आयुक्तांकडे प्रशासकपदाची जबाबदारी सोपवली. आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला आहे. शिवाय, ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे त्यापूर्वीच निवडणूक होईल, हे निश्चित असल्याने इच्छुकांच्या हाती केवळ तीन महिने राहिले आहेत.

निवडणुकीची तयारी...
- राज्य सरकारने २०१७ प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना केली असून, त्याला अंतिम मान्यता मिळाली आहे.
- एक जुलै २०२५ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे व निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेल्यांना मतदान करता येणार आहे.
- प्रभागनिहाय मतदार याद्या विभागणीचे काम निवडणूक विभागाने सुरू केले असून, त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

विविध कार्यक्रम...
राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाची निवडणूक घेण्याबाबत तयारी बघून इच्छुकांनीही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी अनेकांनी दिवाळीचा मुहूर्त साधला आहे. दिवाळी पहाट, दिवाळी सांज यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. फराळ आणि भेटवस्तूंबरोबरच दिवाळी शुभेच्छापत्र दिले जात आहे. यात महिलांनीही आघाडी घेतली आहे. प्रभागातील घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत.

महिलांसाठी आरक्षण
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक ३२ प्रभाग आणि १२८ जागांसाठी होत आहे. यातील ५० टक्के म्हणजे ६४ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. शिवाय, खुल्या जागांवरही त्यांना निवडणूक लढवता येणार आहे. अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अनुक्रमे २०, ३ आणि २७ टक्के आरक्षणानुसार ३५ जागा आरक्षित आहेत. त्यातील १०, २ आणि १७ किंवा १८ जागा महिलांसाठी आरक्षित होतील. यातील उर्वरित जागांवरही महिला निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक महिलांकडून दिवाळीनिमित्त मतदारांशी संपर्क साधला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.