Tomato Prices : अफगाणिस्तानचा पाकवर टोमॅटो स्ट्राईक; एका किलोसाठी मोजावेल लागताय 700 रुपये, शेजारी देशात हाहाःकार
GH News October 22, 2025 03:10 PM

Afghanistan Tomato Strike :  दिवाळखोर पाकिस्तानवर अजून एक संकट आले आहे. अफगाणिस्तानसोबत संघर्ष झाल्यानंतर आता पाकमध्ये टोमॅटोचा भाव गगनाला भिडला आहे. स्थानिक वृत्तानुसार, लाहोर, कराचीसह अनेक शहरात टोमॅटोचा भाव आता विक्रमी 700 रुपये किलोवर पोहचला आहे. काही आठवड्यांपूर्वी टोमॅटो या शहरात अवघ्या 100 रुपये किलोने विक्री होत होता. टोमॅटोच्या किंमतीत यंदा मोठी उसळी आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य पाकिस्तानी माणसांचे बजेट पार कोलमडून गेले आहे. आफगाणिस्तानने अनेक वस्तूंची निर्यात रोखल्याने पाकिस्तानला फटका बसला आहे.

समा टीव्हीनुसार, पाकिस्तानच्या अनेक भागांना अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसलेला आहे. अनेक भागातील पीक संपूर्णपणे नष्ट झाले आहे. त्यातच अफगाणिस्तानमधून येणारा टोमॅटोची आवक कमी झाल्याने मोठा तुटवडा झाला आहे. सीमेवरील संघर्षामुळे अफगाणिस्तानने टोमॅटोची निर्यात थांबवली आहे. इतर भाजीपाला सुद्धा सीमेवरूनच परत पाठवण्यात येत आहे. त्याचा फटका पाकिस्तानमधील अनेक शहरांना बसत आहे. येथे भाजीपाल्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

पाकच्या कोणत्या शहरात टोमॅटोचा काय भाव?

समा टीव्हीनुसार, पंजाबमधील झेलम आणि गुजरांवालामध्ये टोमॅटोच्या किंमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे.

झेलममध्ये टोमॅटोची किंमत 700 रुपये किलोवर पोहचली आहे.

गुजरांवलामध्ये टोमॅटोचा भाव 575 रुपये किलोवर आहे.

फैसलाबादमध्ये टोमॅटोचा भाव 160 रुपयांहून 500 रुपये किलोवर पोहचला आहे

मुल्तानमध्ये टोमॅटो 450 रुपये किलोवर पोहचला आहे

सरकारनुसार सध्या पाकिस्तानमध्ये टोमॅटो सरासरी 170 रुपये किलोने विक्री होत आहे

अफगाणिस्तानने रसद तोडली

समा टीव्हीच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने सीमेवरतीच भाजीपाला परत पाठवण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे टोमॅटोसह इतर भाजीपाल्याच्या किंमतीत भयंकर वाढ झाली आहे. पुरवठ्यामध्ये कमी आल्याने आणि मागणी वाढल्याने टोमॅटोच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. क्वेटा आणि पेशावरमधील व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानमधील व्यापारी मार्ग बंद झाल्याने टोमॅटोच्या किंमती आकाशाला भिडल्याचे सांगितले.

एका व्यापाऱ्याने समा टीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, सरकारने तातडीने इराणमधील टोमॅटो मागवले आहे. पण ते येईपर्यंत पाकिस्तानी नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. तर इराणी टोमॅटो पाकिस्तानमध्ये येईपर्यंत किती ताजे असतील असा प्रश्नही व्यापाऱ्याने विचारला आहे. सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तातडीने अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारशी चर्चा करण्याची सल्ला शरीफ सरकारला दिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.