Mumbai News: 'कूपर'मध्ये औषधांचा तुटवडा, रुग्णांची गैरसोय!
esakal October 22, 2025 02:45 PM

मुंबई : मुंबईतील पालिकेच्या कूपर रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून काही महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारादरम्यान काही वेळा आवश्यक औषधे बाहेरून विकत घ्यावी लागत आहेत.

कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमुख डॉ. देविदास शेट्टी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘‘औषध संपल्याची स्थिती पूर्वी होती. औषधखरेदीची ऑर्डर त्याच वेळी करण्यात आली आहे. औषधखरेदी निविदा काढण्यात आली असून, टेंडरप्रमाणे मुदतीत औषधे मिळतात.’’

पीडितेला अंतरिम पाच लाखांची भरपाई! राज्य सरकारची माहिती; गोरक्षकांच्या मारहाणीत पतीचा मृत्यू

रुग्णालयाच्या फार्मसीत डायक्लोफेनाक, पॅंटोप्राझोल, कॅल्शियम, तसेच काही अँटिबायोटिक औषधे आणि एंटी-रेबीज लस सध्या मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती या वेळी रुग्णालयप्रशासनाकडून देण्यात आली. परिणामी यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कूपर रुग्णालय हे पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक असून, येथे दरवर्षी सुमारे ७.५ लाखांहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. या मोठ्या रुग्णसंख्येमुळे औषधसाठ्यावरील ताण वाढल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. काही रुग्णांनी मानसिक आजारावरील औषधे आणि लस उपलब्ध नसल्याची तक्रार केली आहे.

दरम्यान, औषध टंचाईबाबत बोलताना येथील रुग्ण बाबर शेख आणि सुजय सरकार यांनी सांगितले की, ‘मानसोपचारावरील औषधे मिळत नसल्याने आमचा उपचार थांबला आहे.’ गीता शर्मा या एंटी-रेबीज लसी घेण्यासाठी गेल्या असता त्यांना ती उपलब्ध झाली नाही, मात्र या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाला विचारले असता औषधेखरेदी निविदा निघाल्याचे सांगण्यात आले. मात्र मर्यादित औषधांच्या साठ्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

Mumbai Fire: दिवाळी सणाच्या ६० तासांत मुंबईत आगीच्या ५० घटना; कफ परेड येथील आगीत १६ वर्षाच्या मुलाने गमावले प्राण सातत्य राखणे महत्त्वाचे!

तज्ज्ञांच्या मते, औषधोपचारांत सातत्य राखणे महत्त्वाचे असते. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, ‘‘औषधपुरवठा प्रक्रिया सुरू असून, लवकरच सर्व औषधे नियमित उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.’’ सध्या पालिका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही समजते. कूपर रुग्णालयातील ही स्थिती सुधारण्यासाठी लवकरच उपाययोजना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.