भोसरी, ता. २१ ः येथील टेल्को रस्त्यावर गतिरोधकावरील पांढरे पट्टे नाहीसे झाल्यामुळे वाहन चालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहन चालकांकडून गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याची मागणी केली जात आहे. भोसरीतील टेल्को रस्त्यावरील विविध ठिकाणी असलेल्या गतिरोधकावरील पांढरे पट्टे नाहीसे झाल्यामुळे आता ते वाहन चालकांना दिसत नाहीत. भोसरी एमआयडीसीमध्ये दळणवळणासाठी हा प्रमुख रस्ता आहे. याचा उपयोग भोसरी, पिंपरी-चिंचवड शहर, निगडी, देहूरोड इत्यादी परिसरात ये-जा करण्यासाठी होतो. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी असते. रस्ता मोठा असल्याने वाहनांचा वेगही अधिक असतो. मात्र, पांढरे पट्टे नाहीसे झाल्यामुळे वाहन चालकांना गतिरोधक दिसण्यात अडचण येते, आणि अचानक त्यावरून वाहने जाताना घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याची मागणी वाहनचालक आणि नागरिकांमधून होत आहे.