मुंबई : आयटी कंपनी असलेल्या कोफोर्ज लिमिटेडने चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या निव्वळ नफ्यात १८.४% वाढ झाली आहे. नफा मागील तिमाहीतील ३१७.४ कोटी रुपयांच्या तुलनेत ३७५.८ कोटी रुपयांवर गेला आहे. Coforge Limited चे शेअर्स शुक्रवारी बीएसईवर १,७६० रुपयांवर बंद झाले.
Coforge Limited ने तिमाही निकालांसह लाभांश देण्याची घोषणा केली. कंपनीने सांगितले की संचालक मंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ४ रुपयांचा चौथा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. या लाभांशाची रेकॉर्ड तारीख ३१ ऑक्टोबर आहे.
सप्टेंबर तिमाहीत कोफोर्ज लिमिटेडचा महसूल ३,९८५.७ कोटी रुपये राहिला आहे. मागील तिमाहीतील ३,६८८.६ कोटींपेक्षा महसूल ८% जास्त आहे. डॉलरच्या बाबतीत कंपनीचा महसूल ४४२ दशलक्ष डाॅलरच्या तुलनेत ४६२ दशलक्ष डाॅलर आहे.
सप्टेंबर तिमाहीत कोफोर्जचा EBIT (व्याज आणि करपूर्व उत्पन्न) ५६० कोटी रुपये आहे. मागील तिमाहीत हा आकडा ४१७.८ कोटी रुपये होता. EBIT मार्जिन देखील ११.४% वरून १४% पर्यंत वाढला. सप्टेंबर तिमाहीत कंपनीची कर्मचारी संख्या ३४,८९६ पर्यंत वाढली, तिमाहीत ७०९ नवीन कर्मचारी जोडले गेले. कंपनीने एट्रिशन रेट म्हणजे कंपनी सोडून जाण्याचा दर ११.४% कायम ठेवला, जो आयटी उद्योगातील सर्वात कमी आहे.
कोफोर्जचे सीईओ आणि कार्यकारी संचालक सुधीर सिंग म्हणाले, सप्टेंबर तिमाहीत ८.१% ची मजबूत तिमाही वाढ, पुढील १२ महिन्यांसाठी ऑर्डर बुकमध्ये २६.७% वाढ, ईबीआयटी मार्जिनमध्ये २५० बेसिस पॉइंट सुधारणा आणि खूप कमी एट्रिशन रेट हे सर्व कोफोर्जसाठी आर्थिक वर्ष २०२६ हे एक मजबूत वर्ष असल्याचे दर्शविते.