Womens World Cup : दक्षिण अफ्रिकेचा खेळ 97 धावांवर खल्लास, भारताचा सामना होणार ऑस्ट्रेलियाशी!
GH News October 25, 2025 08:10 PM

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या 26 व्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने नांगी टाकल्याचं पाहायला मिळालं. नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला होता. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचा संघ फलंदाजीसाठी आला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर पुरते हतबल दिसले. कर्णधार लॉरा वॉल्वर्ट आणि विकेटकीपर सिनालो जाफ्ता वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकलं नाही. दक्षिण अफ्रिकेने 24 षटकात 97 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 98 धावांचं आव्हान ठेवलं आहे. 97 धावा हा दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या आहे.ऑस्ट्रेलियाकडून एलाने किंगने सर्वोत्तम गोलंदाजी केली. तिने दक्षिण अफ्रिकेचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला. तिने अवघ्या 7 षटकात 18 धावा देत 7 गडी बाद केले. यात तिने दोन षटकं निर्धाव टाकली. तसेच मेगन शट, किम गार्थ आणि एशले गार्डनरने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दक्षिण अफ्रिकेचे पाच फलंदाज एकेरी धावांवर बाद झाले. तर दोन जणांना खातंही खोलता आलं नाही. तर एक फलंदाज नाबाद 1 धावेवर राहिला. कर्णधार लॉरी वॉल्वर्टने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. तिने 26 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने धावा केल्या. तर सिनालो जाफ्ताने 17 चेंडूत 7 चौकार मारत 29 धावा केल्या. तर नादीन डी क्लर्न 14 धावांची खेळी केली. दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला दिलेलं आव्हान खूपच तोकडं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सहज विजय मिळवेल असं दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. तर दक्षिण अफ्रिकेचा सामना इंग्लंडशी होईल.

एलाना किंगने 7 विकेट घेतल्यानंतर सांगितलं की, ‘ही एक चांगली खेळी आहे, यात काही शंका नाही. पण मला ऑस्ट्रेलियाला चांगल्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करायला आवडतो आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या दर्जेदार संघाला 100 च्या आत बाद करणे चांगली गोष्ट आहे. आम्ही आता येथे काही सामने खेळलो आहोत. त्यामुळे आम्हाला माहित होते की थोडी फिरकी असेल .परंतु जेव्हा तुम्ही नवीन खेळपट्टीवर खेळता तेव्हा तुम्हाला शक्य तितक्या लवकर परिस्थितीचे मूल्यांकन करावे लागेल. मला वाटले की थोड्याशा रिमझिम पावसाने ते कमी झाले असेल, परंतु तरीही मी काही फिरकी काढण्यात यशस्वी झाले, म्हणून मी त्याबद्दल खूप खूश आहे.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.