Parbhani Crime: दरोडेखोरांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, आजी गंभीर; सेलूच्या वालूर शिवारात धुमाकूळ, वृद्ध दांपत्यावरही हल्ला
esakal October 26, 2025 06:45 AM

सेलू (जि. परभणी) : वालूर (ता. सेलू) येथील शेतवस्तीवर दरोडेखोरांनी गुरुवारी (ता. २३) मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत धुमाकूळ घातला. शेतातील घरावर (आखाडा) दरोडेखोरांनी केलेल्या सशस्र हल्ल्यात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर त्याची आजी गंभीर जखमी झाली.

त्यानंतर दरोडेखोरांनी याच परिसरातील अन्य एका आखाड्यावरील वृद्ध दांपत्यावर हल्ला करून त्यांचे दागिने लंपास केले. परिसरातील पारडी (कौसडी) जवळील आखाड्यासमोरून दुचाकी पळविली. सुमारे २५ ते ३५ वयोगटातील, बनियन, पँट परिधान केलेल्या तीन ते चार जणांनी हल्ला केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

Nashik Crime : झोक्यावर खेळताना गळफास लागून ९ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; कृष्णा बेशुद्ध झाला अन्...

वालूर गावापासून दोन किलोमीटरवर वालूर-बोरी मार्गावरील सर्व्हे क्रमांक ५० / १ मधील शेतातील आखाड्याला दरोडेखोरांनी सुरवातीला लक्ष्य केले. या आखाड्यातील संतोष आसाराम सोनवणे (वय २४) याच्या डोक्यात, मानेवर शस्त्राने वार करून त्याला ठार केले. त्याची आजी वच्छलाबाई राणबा सोनवणे (७५) यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व त्यांच्याजवळील रोख रक्कम असा सुमारे ३० हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला.

याच परिसरातील सर्व्हे क्रमांक १०० मधील श्री कृष्ण मंदिरात असलेल्या दत्तराव कोंडीबा भोकरे व त्यांची पत्नी सरूबाई दत्तराव भोकरे या वृद्ध दांपत्यावर दरोडेखोरांना हल्ला करून त्यांचे दागिने लंपास केले. या हल्ल्यात दत्तराव भोकरे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर परभणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्यानंतर दरोडेखोरांनी वालूर- आडगाव दराडे मार्गावरील तुकाराम हरिभाऊ मुंढे यांच्या शेताकडे मोर्चा वळविला. तेथे पिकास पाणी देणाऱ्या बंडू बालचंद पवार यास शस्त्राचा धाक दाखविला. त्यामुळे भीतीपोटी त्याने पळ काढला. त्यानंतर जवळच असलेल्या पारडी कौसडी गावाजवळील आखाड्यासमोरून रामेश्वर उल्हास राठोड यांची दुचाकी (स्पेलंडर प्लस एमएच २२ एएल ६०१६) लंपास केली.

विशेष पथक नियुक्त

पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुण संतोष याचे वडील आसाराम राणबा सोनवणे यांच्या तक्रारीवरून सेलू पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तपासासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिसांसमोर आव्हान

गेल्या दोन दिवसांपूर्वी शेत आखाड्यावर झालेल्या थरारक घटनेनंतर पोलिस यंत्रणेकडून परिसरातील सुरू असलेल्या तपासावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढी गंभीर घटना घडूनही त्याचे धागेदोरेही अद्याप का सापडले नाहीत, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.