तिकीट तपासणीसाचाच मोबाईल चोरीला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : कुशीनगर एक्स्प्रेसमधून कोच तिकीट तपासणीसाचाच फोन चोरील गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हा गुन्हा भुसावळ येथून शून्य नंबरने ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
शशिकुमार प्रसाद (वय २३, रा. भुसावळ) हे तिकीट तपासणीस आहेत. ते कोच तिकीट तपासणीस म्हणून कुशीनगर एक्स्प्रेसने मुंबईला येत होते. मात्र इगतपुरी ते कसारा ब्लॉक असल्याने १६ ऑक्टोबर रोजी पहाटे ती गाडी ठाणे रेल्वे स्थानकात आली. त्यानंतर शशिकुमार यांनी आपला मोबाईल चार्जिंगला लावून ते बाथरूमला गेले. याचदरम्यान चोरट्याने त्यांचा २५ हजार रुपयांचा मोबाईल घेऊन पोबारा गेला. याप्रकरणी १८ ऑक्टोबर रोजी भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. हा गुन्हा ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.