Kolhapur Brain Stroke Case : व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी २३ वर्षीय विशालला ब्रेन स्ट्रोक; क्षणात संपलं सगळं, कोल्हापुरातील घटनेनं सर्वत्र हळहळ
esakal October 26, 2025 06:45 AM

Kolhapur Young Entrepreneur Dies (कुंडलीक पाटील) : सोन्यावर कलाकारी करण्याची आवड होती.गुजरीत प्रशिक्षण घेऊन नवीन व्यवसायात भरारी घेण्याची स्वप्न उराशी बाळगली होती. दीपावली रोजी सोनार व्यवसायाची सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी मृत्यूने गाठले .विशाल संजय आडनाईक (रा.खुपीरे)या अवघ्या २३ वर्षाच्या युवकाला बुधवारी सकाळी आंघोळ करत असताना ब्रेन स्ट्रोक आल्याने मृत्यू झाला.

दीपावली रोजी शुभारंभ केलेल्या सोन्याच्या दुकानात जाण्याच्या तयारीत असलेल्या विशालवर असा काळाने घाला घातल्याने संपूर्ण खुपीरे पंचक्रोशीत शोककळा पसरली. विशालचे वडील संजय आडनाईक हे कुंभी कासारी साखर कारखान्यात कामगार प्रतिनिधी आहेत. ते नोकरीला जाण्यापूर्वी सोनार व्यवसाय करायचे.

लहान असणाऱ्या विशालने नोकरीच्या शोधात वेळ न घालवता सोनार व्यवसाय करण्याची वडिलांकडे इच्छा व्यक्त केली.वाडिलांनीही त्याला सोनार कामाचे प्रशिक्षण घ्यायला मुभा दिली. बुधवारी संध्याकाळी लक्ष्मी पूजन दिवशी गावातील एका संस्थेच्या दुकान गाळ्यांत मोठ्या थाटात सोनार व्यवसायाचे उद्घाटन करण्यात आले. नातेवाईक, मित्र मंडळांनी विशालला शुभेच्छा व आशिर्वाद दिला.

Kolhapur Family Attack : इचलकरंजीत फटाके उडवत असताना हल्ला; जर्मनी गँगकडून पती, पत्नी आणि मुलावर कोयत्याने सपासप मारलं अन्

दीपावली रोजी विशालचा आनंद गगनात मावत नव्हता. मात्र घडले ते विपरित चे होते. गुरुवारी सकाळी आंघोळ करण्यासाठी तो बाथरूममध्ये गेला. आंघोळीसाठी दोन तांबे पाणी अंगावर ओतून घेताच त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. बाथरूममध्ये तो जोरात पडल्याचा आवाज आल्याने घरातल्यांनी धाव घेतली. त्याला उठताही येत नसल्याने ताबडतोब कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. व्यवसायाच्या पहिल्या दिवशी आणि ऐन दिवाळीच्या सणात तरणाबांड मुलगा हरपल्याने आईवडिलांसह नातेवाईकांनी हंबरडा फोडला. विशालच्या पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.