राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे, मात्र त्यानंतर आता हैदराबाद गॅझेटनुसार आमचा समावेश हा एसटी प्रवर्गात करावा अशी मागणी बंजारा समाजामधून होत आहे. बंजारा समाजाचा समावेश हा एसटी प्रवर्गात करावा या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीनं अनेक ठिकाणी आंदलोनं देखील करण्यात आली आहेत.
दरम्यान त्यानंतर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाजाचे कार्यकर्ते विजय चव्हाण यांनी जालन्यात उपोषणाला सुरुवात केली होती, अखेर आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली, या शिष्टमंडळामध्ये मंत्री संजय राठोड, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार अर्जुन खोतकर यांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर अखेर विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. त्यांनी नवव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मंत्री पंकजा मुंडे, संजय राठोड आणि अर्जुन खोतकर यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.
काय म्हणाले विजय चव्हाण?
समाज म्हणतो आहे, म्हणून मी उपोषण मागे घेतो. मागच्या 45 वर्षांपासून आमची हीच मागणी आहे. अनेक मोर्चे झाले, उपोषणं झाली, मात्र आमची कोणतीही दखल घेतली गेली नाही. आमची मागणी रास्त आहे, जोपर्यंत जीआर काढणार नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी विजय चव्हाण यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सर्वांना माझा जय सेवालाल, मागच्या 9 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण विजय चव्हाण यांनी मागे घ्यावं. मी सरकार म्हणून आले असले तरी तुमची प्रतिनिधी म्हणून आले आहे. त्यांची तब्येत खालवलेली आहे. आम्हाला तुमचा जीव मोलाचा आहे, मी सर्व पाहत आलेली आहे. माझाही समाज आजही ऊस तोडतो आहे, तुमचा जीव महत्वाचा आहे. आता आपण सर्वजण मराठा आरक्षणांचं पाहातच आहोत, तसा एका दिवसात जीआर काढणं शक्य नाही. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं आहे की, यांचं एक शिष्टमंडळ घेऊन या, आपण या संदर्भात एक कालावधी ठरवू, अधिवेशनात यांचा विषय घ्यावा लागेल, बंजारा समाज हा लढणारा समाज आहे, असं यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.