लोणावळा, ता. २५ : दहीवली-कार्ला येथे संस्कारशाला श्री प्रबलजी महाराज कुटी येथे शंभर कुंडीय श्री विष्णू महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (ता.२६) ते शनिवार (एक नोव्हेंबर) दरम्यान हा महायज्ञ होणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमांना ब्रह्मानंद सरस्वती महाराज यांची प्रमुख उपस्थिती असेल. तर, डॉ. श्री गुणप्रकाश चैतन्य महाराज हे कथावाचन करणार आहेत.
या महायज्ञात देशभरातून प्रतिष्ठित वेदपाठी, ऋषिकुमार आणि भाविक सहभागी होणार आहेत. यज्ञादरम्यान विविध धार्मिक विधी, सत्संग, प्रवचन, कीर्तन, भजन तसेच श्री विष्णू सहस्त्रनाम पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्कारशालेच्या वतीने भाविकांसाठी मोफत प्रसाद व निवासाची सोय करण्यात आली आहे. या प्रसंगी परिसरात भव्य सजावट, तोरणमंडप आणि भक्तांसाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. या यज्ञकार्यात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. गुणप्रकाश चैतन्य महाराज यांनी केले आहे.