भोसरी, ता. २५ : भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर परिसरांत रस्त्यांवर ठिकठिकाणी राडारोडा साचला आहे. परिसरातील मोकळ्या भूखंडांवरही हीच स्थिती आहे. त्यामुळे अस्वच्छता आणि बकालपणा वाढला आहे. ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत रस्त्यावर सीसीटीव्ही बसविलेले असतानाही राडारोडा टाकणाऱ्यांचा शोध महापालिकेला लागत नसल्याची स्थिती आहे. या अस्वच्छतेला जबाबदार नेमके कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राडारोडा टाकण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरात काही ठिकाणे निश्चित केली आहेत. तेथे राडारोडा विनामोबदला टाकण्यास दिला जातो. तरीही, काही नागरिक शिस्त पाळत नाहीत. भोसरी, मोशी, दिघी, इंद्रायणीनगरकडे जाण्यासाठी नाशिक फाट्याकडून प्रवासी येतात. मात्र, त्यांचे स्वागत राडारोड्याने होत आहे. काही वेळेस गटारातील ओला कचरा टाकण्यात येत असल्याने दुर्गंधीही पसरलेली असते. हा राडारोडा महापालिकेद्वारे उचलला जातो. त्यासाठी ठेकेदाराला मोबदलाही द्यावा लागतो. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. महामार्गावरील राडारोडा उचलल्यास दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा तशीच स्थिती निर्माण होते.
येथे टाकला जातो राडारोडा
१. भोसरी : पुणे-नाशिक महामार्गावरील लांडेवाडीतील प्रवेशद्वार ते भोसरी पोलिस ठाण्यापर्यंत दोन्ही बाजूंकडील रस्ता,
आळंदी रस्त्यावर दुर्वांकूर लॉन्स ते कै. रामभाऊ गबाजी गवळी उद्यानापर्यंतचा रस्ता, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील रिकामी जागा
२. दिघी : भारतमातानगर ते आळंदी रस्त्याला जोडणारा रस्ता, विठ्ठल मंदिराजवळून यमाई मंदिराकडे जाणारा रस्ता, जुना जकात नाका ते बोपखेल फाट्यापर्यंतचा रस्ता.
३. इंद्रायणीनगर : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैष्णोमाता शाळेसमोरून इंद्रायणीनगरकडे जाणारा रस्ता, खंडेवस्तीसमोरून पेठ क्रमांक दहाकडे जाणारा रस्ता.
४. भोसरी एमआयडीसी : एस-१८ ब्लॉकमधील पुणे टेक्ट्रॉल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसमोरील रस्ता, यशवंतराव चव्हाण चौकाजवळील मोकळा भूखंड.
टाकाऊ पदार्थ, मोडक्या वस्तूंचाही समावेश
या राडारोड्यात बांधकामातील टाकाऊ साहित्य, कंपन्यातील टाकाऊ पदार्थ, भट्टीतील जळालेली माती, गटारातील राडारोडा, घरातील टाकाऊ फर्निचर, गाद्या, कपडे, काचेच्या तुटक्या वस्तू, नारळपाणी विक्रेत्यांद्वारे रिकामे नारळ, तोडलेल्या झाडांचा फांद्या, पालापाचोळा आणि अन्य वस्तू रस्त्यांकडेला टाकण्यात येत आहेत.
नागरिकांची प्रशासनाकडून अपेक्षा
- रस्त्याकडेला राडारोडा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे
- वारंवार राडारोडा टाकण्यात येणाऱ्या परिसरांत गस्त वाढविणे
- स्मार्ट सिटीअंतर्गत सीसीटीव्हीचा उपयोग करून राडारोडा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवणे
- कारवाई करताना राजकीय हस्तक्षेप होऊ न देणे
राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पूर्वी नेमलेले ‘ग्रीन मार्शल’ पथक बंद करण्यात आले आहे. हे पथक पुन्हा सुरू केले पाहिजे. राडारोडा उचलण्याची यंत्रणा महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे आहे. त्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. राडारोडा टाकताना आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल.
- तानाजी दाते, सहायक आरोग्य अधिकारी, ‘क’ प्रभाग
रस्त्याकडेचा कचरा आरोग्य विभागाद्वारे उचलला जातो. मात्र, राडारोडा उचलण्याची जबाबदारी महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे आहे. रस्त्यावरील राडारोडा उचलण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला कळविले जाईल.
- अंकुश झिटे, सहायक आरोग्य अधिकारी, ‘ह’ प्रभाग
भोसरीतील आळंदी रस्ता, दिघी परिसरातील रस्त्याच्याकडेला राडरोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना आरोग्य निरीक्षकांना देण्यात येतील. राडारोडा उचलण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला कळविण्यात येईल.
- राजेश भाट, सहायक आरोग्य अधिकारी, ‘इ’ प्रभाग
रस्त्याकडेला राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. आरोग्य विभागाने राडारोड्याबद्दल माहिती दिल्यास तो राडारोडा उचलण्यात येईल.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग, महानगरपालिका