बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी, आपली ओळख बनवण्यासाठी तसेच अस्तित्व निर्माण करण्यासाठी कलाकारांनी ,सेलिब्रिटींनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीवर नाव,काम,फेम अन् पसिद्धी कमावली आहे. असाच एक अभिनेता आहे ज्याने अतिशय गरीबीतून दिवस काढले, मेहनतीने इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमावलं.
पण स्ट्रगलच्या दिवसांत घर चालवण्यासाठी या अभिनेत्याने रस्त्यांवर पेन विकले, दारूच्या दुकानाबाहेर चणेही विकले. पण जेव्हा बॉलिवूडमध्ये संधी मिळाली तेव्हा या अभिनेत्याने त्या संधीचं सोनं केलं. स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं.आज शाहरूख खान देखील या अभिनेत्याचा चाहता आहे. हा अभिनेता म्हणजे इंडस्ट्रीतील कॉमेडी किंग जॉनी लिव्हर.
इंडस्ट्रीतील कॉमेडी किंग
जॉनी लिव्हर आज भारतातील सर्वात प्रिय आणि आदरणीय विनोदी कलाकारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. 1990 च्या दशकात, जेव्हा कादर खान आणि शक्ती कपूर सारख्या दिग्गजांनी विनोदी भूमिकांवर वर्चस्व गाजवले. तेव्हा जॉनी यांनी त्यांच्या अनोख्या कॉमिक टायमिंग आणि शैलीने स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले.पण जॉनी लिव्हर यांचे बालपण अत्यंत कठीण होते. आर्थिक अडचणींमुळे, त्यांना अगदी लहान वयातच शिक्षण सोडून काम सुरू करावे लागले.
दारूच्या दुकानाजवळ चणे विकायचा अभिनेता
एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितलं होतं, ते म्हणाले होते “मी वयाच्या 10 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. मी एका दारूच्या दुकानाजवळ भाजलेल्या चण्या विक्रेत्याकडे काम केले. ते पैसे घर चालवण्यासाठी पुरेसे होते. मी सकाळी शाळेत जायचो, पण मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकलो नाही. अखेर सातवीनंतर मला शाळा सोडावी लागली.”
कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी, जॉनी यांनी मुंबईच्या रस्त्यांवर पेन विकायला सुरुवात केली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते प्रसिद्ध चित्रपट कलाकारांचे अनुकरण करायचे. त्यांची मिमिक्री करायचे. त्यानंतर त्यांनी हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये नोकरी स्वीकारली, जिथे ते त्यांच्या सहकाऱ्यांचे अनुकरण करून सर्वांना हसवत असे. यासोबतच, ते छोट्या स्टेज शोमध्येही भाग घेऊ लागले.
पहिली मोठी संधी
अशाच एका स्टेज शोमध्ये अभिनेते सुनील दत्त यांनी जॉनी यांचा अभिनय पाहिला. त्यावेळी ते एवढे प्रभावित झाले की दत्त यांनी जॉनीला त्यांच्या ‘दर्द का रिश्ता’ या चित्रपटात भूमिका देऊ केली. याआधी जॉनी यांनी ‘तुम पर हम कुर्बान’ या चित्रपटात काम केले होते, जो फार चालला नाही. तथापि, सुनील दत्त यांच्यासोबत काम करणे हे त्यांच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यानंतर अनेक चित्रपट आले आणि जॉनी लिव्हर हळूहळू बॉलीवूडमधील सर्वात आवडत्या विनोदी कलाकारांपैकी एक बनले. त्यांनी केवळ विनोदातच प्रभुत्व मिळवले नाही तर भावनिक सीन्ससाठी देखील ते तेवढेच मेहनत घ्यायचे आणि त्यांचा हा जॉनर देखील लोकांना तेवढाच आवडला.
शाहरूख खानही अभिनेत्याचा चाहता
फक्त प्रेक्षकांनाच नाही तर बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत जे जॉनी यांचे चाहते आहेत. त्यातील एक म्हणजे बादशाह शाहरूख खान. त्याने अनेक मुलाखतींमध्येही हे सांगितले आहे. की त्याची जोडी ही जॉनी लिव्हर यांच्यासोबत जास्त चांगली जमते. तसेच जॉनीचे टाईमिंग देखील आवडते. दारूच्या दुकानाबाहेर चणे विकण्यापासून ते जागतिक स्तरावर कौतुक मिळवण्यापर्यंत, जॉनी यांची कहाणी केवळ मनोरंजनाची नाही तर धैर्य, संघर्ष आणि आत्मविश्वासाची देखील आहे. त्यांनी मेहनतीने जेवढं काही कमावलं आहे ते खरोखरंच कौतुकास्पद आहे.