नवी दिल्ली: आग्रा येथे एका वेगवान कारने पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन पाच जण ठार आणि दोन जखमी झाल्याची माहिती शनिवारी दिली. सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) शेषमणी उपाध्याय यांनी सांगितले की, पाच गंभीर जखमींना शुक्रवारी रात्री सरोजिनी नायडू वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, तेथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी पाचही जणांना मृत घोषित केले.
बबली (३३), भानू प्रताप (२५), कमल (२३), क्रिश (२०) आणि बंतेश (२१) अशी मृतांची नावे आहेत. भानू प्रताप हा एका खाजगी कंपनीत पार्सल डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. कमल आणि क्रिश हे मित्र होते. कुटुंबीयांनी सांगितले की, क्रिश शनिवारी दिल्लीला रवाना होणार होता आणि तो आणि कमल दोघांनी एकत्र प्रवास करण्याचा बेत आखला होता.
हा अपघात न्यू आग्रा पोलीस स्टेशन हद्दीत नागला बुधीजवळ, सेंट्रल हिंदी इन्स्टिट्यूटच्या पुढे झाला. पोलीस सूत्रांनी अपघातात सहभागी असलेल्या चालकाची ओळख अंशू गुप्ता (४०) अशी केली असून तो आग्रा येथील रहिवासी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता हे नोएडा येथील एका खासगी कंपनीत इंजिनिअर असून ते दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी आले होते.
अपघाताच्या वेळी अंशू हा मद्यधुंद अवस्थेत होता, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, कार वेगात होती आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना धडकण्यापूर्वी ती रस्ता दुभाजकाला धडकली.
या अपघातात सात जण जखमी झाले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि गोलू या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. चालकाला अटक करण्यात आली असून, वाहन जप्त करण्यात आले आहे.