Womens World Cup : भारत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीची लढत, सामना रद्द झाला तर अंतिम फेरीत कोण?
GH News October 26, 2025 01:10 AM

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यांचे वेध लागले आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि भारताने धडक मारली आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ टॉपला राहिला. तर भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. उपांत्य फेरीची लढत 30 ऑक्टोबरला होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. हा सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे. उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट असलं तरी या संपूर्ण स्पर्धेवर पावसाचं सावट राहिलं आहे. त्यामुळे उपांत्य पावसाने हजेरी लावली तर काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. साखळी फेरीत पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर 1-1 गुण वाटून दिला जात होता. पण उपांत्य फेरीत तसं काही करता येणार नाही. मग उपांत्य फेरीच्या सामन्याचा निकाल कसा लागणार? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर पुढे आहे.

उपांत्य फेरीत पावसाने हजेरी लावली तर…

उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर एक अतिरिक्त दिवस देण्यात आला आहे. सामना जिथे संपला तेथून पुढच्या दिवशी सामना सुरु होईल. म्हणजेच दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड सामन्यात पाऊस पडला तर हा सामना दुसऱ्या दिवशी होईल. 29 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. जर त्या दिवशी झाला नाही तर 30 ऑक्टोबरला जेथे थांबला तेथून सुरु होईल. असंच भारत ऑस्ट्रेलिया सामन्याचं आहे. हा सामना 30 ऑक्टोबरला होणार आहे. पण 31 ऑक्टोबरचा दिवस राखीव असणार आहे. पण राखीव दिवशीही सामना झाला नाही तर काय?

राखीव दिवशीही सामना झाला नाही तर अंतिम फेरीतील संघाचा निकाल गुणतालिकेवरून ठरवला जाईल. म्हणजेच भारत ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे झालाच नाही तर अंतिम फेरीचं तिकीट ऑस्ट्रेलियाला मिळेल. असंच दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या सामन्यात असेल. जो संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असेल त्याला पुढे जाण्याची संधी मिळेल.

अंतिम सामना पावसामुळे झाला नाही तर..

उपांत्य फेरीप्रमाणे अंतिम फेरीसाठीही एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. अंतिम फेरीचा सामना 2 नोव्हेंबरला होणार आहे. त्या दिवशी पावसामुळे सामना झाला नाही तर 3 नोव्हेंबरला होईल. पण या दिवशीही सामना झाला नाही तर अंतिम फेरीत स्थान मिळवलेल्या दोन्ही संघांना विजयी घोषित केलं जाईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.