वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील 26व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला पराभवाची धूळ चारली. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची कर्णधार ताहिला मॅकग्राथचा हा निर्णय योग्य ठरला असंच म्हणावं लागेल. कारण दक्षिण अफ्रिकन फलंदाजांना डोकंच वर काढू दिलं नाही. 24 षटकातच दक्षिण अफ्रिकेचा खेळ खल्लास केला. दक्षिण अफ्रिकेने सर्व गडी गमवून 97 धावा केल्या आणि विजयासाठी 98 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान इतकं सोपं होतं की ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमवून 16.5 षटकात पूर्ण केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत टॉपला राहिला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या लढती निश्चित झाल्या आहे. ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी, दक्षिण अफ्रिकेचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
ऑस्ट्रेलियाकडून एलाना किंग्सने भेदक गोलंदाजी दर्शन घडवलं. खरं तर तिच्या गोलंदाजीचा सामना करताना दक्षिण अफ्रिकन फलंदाजांनी त्रेधातिरपीट उडाली. दक्षिण अफ्रिकेने सावध सुरुवात केली होती. त्यांना लॉरी वॉल्वर्टच्या रुपाने पहिला धक्का 32 धावांवर बसला. त्यानंतर धडाधड विकेट पडत गेल्या. तझमिन ब्रिट्सने दक्षिण अफ्रिकेची दुसरी विकेट काढली. त्यानंतरच्या सहा विकेट एलाना किंगने काढल्या. नववी विकेट एशले गार्डनरला मिळाली. तर शेवटची विकेट एलाना किंगने काढत दक्षिण अफ्रिकेला 97 धावांवर रोखलं. एलाना किंगने 7 षटकात 2 षटकं निर्धाव टाकली आणि 18 धावा देत 7 गडी बाद केले.
दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 98 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही चांगली झाली नाही. अवघ्या 6 धावांवर पहिली विकेट पडली. तर संघाच्या 11 धावा असताना एलिसा पेरी बाद झाली. तिला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर जॉर्जिया वोल आणि बेथ मूनी यांनी डाव सावरला. या दोघांनी मिळून 76 भागीदारी केली आणि विजयाच्या वेशीजवळ आणलं. विजयासाठी 11 धावांची गरज असताना बेथ मूनी बाद झाली. त्यानंतर एनाबेल सदरलँड मैदानात आली. वोलने एक धाव घेत तिला स्ट्राईक दिला. तिने सलग दोन चौकार आणि दोन धावा काढत संघाला विजय मिळवून दिला.