सोन्याची झळाळी झाली कमी, ४ दिवसात ७ हजारांनी स्वस्त; आज किती आहे दर?
esakal October 26, 2025 01:45 PM

काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. मात्र गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. पण आता चार दिवसात १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७ हजार रुपयांची घसरण झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारासह मल्टि कमोडिटी एक्सचेंज आणि देशांतर्गत बाजारातही दर कमी झाले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १.३० लाखाच्या वर होता. तर शेवटच्या दिवशी १.२३ लाख रुपये इतका खाली आला.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्सवर सोमवारी २० ऑक्टोबरला ९९९ शुद्धतेच्या सोन्याचा वायदा बाजारातील दर १ लाख ३० हजार ६२४ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण सुरू झाली. शुक्रवारपर्यंत सोन्याचे दर घसरून १ लाख २३ हजार २५४ रुपयांवर आले. म्हणजेच पाच दिवसात एमसीएक्सवर सोनं ७ हजार ३६९ रुपयांनी स्वस्त झालं.

'जैन मंदिर किंवा मंत्रिपद वाचवा', मोहोळ यांना मुंबईत वरिष्ठांनी वॉर्निंग दिल्याचा धंगेकरांचा खळबळजनक दावा

देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी बाजार सुरू झाला तेव्हा २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २६ हजार ७३० रुपये इतका होता. तर बाजार बंद होताना हा दर १ लाख २७ हजार ६३३ रुपयांवर पोहोचला होता. यानंतर बुधवारी जेव्हा बाजार सुरू झाला तेव्हा सोन्याच्या दरात प्रचंड घसरण झाली. शुक्रवारी सोन्याचा दर १ लाख २१ हजार ५१८ रुपयांवर आला. पाच दिवसात देशातील भाजारात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमला ६ हजार ११५ रुपयांनी कमी झाला.

सोन्याच्या किंमतीत घसरणीमागे तज्ज्ञांनी अनेक कारणं सांगितली आहेत. सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर गुंतवणूकदार आता त्यातून नफा कमावण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसून येतोय. याशिवाय अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ टेन्शनही कमी होताना दिसतंय. यामुळे सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.