Kolhapur Collector Office : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात शिक्षकाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न, अचानक घडलेल्या प्रकारामुळे तणाव
esakal October 26, 2025 01:45 PM

Kolhapur Teacher News : सार्वजनिक बांधकाम विभागाने बेकायदेशीरपणे बांधकाम पाडल्याचा आरोप करत बेनिक्रे (ता. कागल) येथील शिक्षक शंकरराव रामशे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न रोखला. नंतर पोलिसांनी समज देऊन त्यांना सोडून दिले.

याबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेनिक्रे ते कुरुकली रस्त्याचे काम सुरू केले जाणार आहे. हा प्रमुख जिल्हा मार्ग असून, तो करड्याळपर्यंत जातो. या मार्गावर बेनिक्रेपैकी रामेश्वरवाडी येथे रस्त्याकडेला शिक्षक शंकरराव रामशे यांनी संरक्षक भिंत आणि शेड उभारले होते. याबाबत अतिक्रमणाची तक्रारही होती. हे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात काढले. ही भिंत आणि शेड स्वतःच्या मालकीच्या जागेत असल्याची भूमिका रामशे यांची आहे. आपल्यावर अन्याय झाला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रामशे यांनी केली.

ते, दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आले. ते आत्मदहनाच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी रामशे आणि पोलिसांच्यात खडाजंगी झाली. त्यांनी पोलिसांना विरोध केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तेथून बाजूला नेले. त्यानंतर पोलिसांनी समज देऊन सोडून दिले. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तणावाचे वातावरण होते.

Kolhapur Crime : गोव्याला फिरायला गेले अन् बंद बंगला फोडून साडेतेरा तोळे दागिने पळविले, श्वान घराच्या भोवतीच घुटमळलं अन्

यावेळी रामशे म्हणाले, ‘‘मी तीन लाख रुपये खर्च करून माझ्या जागेत भिंत बांधली. नारळाची ६० झाडे लावली. कुठला तरी रस्ता केल्याचा दाखवून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पैसे घेण्याचा प्रकार करत आहेत. त्यामुळे मी आत्महत्येचा निर्णय घेतला.’’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.