विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या अनुभवी जोडीने शनिवारी 25 ऑक्टोबरला चाबुक बॅटिंग करत चाहत्यांची मनं जिंकली. या दोघांनी ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. भारताला विजय मिळवून देण्यात रोको जोडीने प्रमुख भूमिका बजावली. रोहितने नाबाद शतक झळकावलं. तर विराटने सलग 2 सामन्यांत झिरोवर आऊट झाल्यानंतर फायनलमध्ये अर्धशतक ठोकलं.
रोहित आणि विराटने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर जवळपास 7 महिन्यांनी कमबॅक केलं. रोहितला या 7 महिन्यांच्या कालावधीत कुटुंबासह स्वत:ला वेळ देता आला. तसेच 7 महिन्यांच्या प्रतिक्षेमुळे दोघांकडूनही चाहत्यांना मोठी खेळीची आशा होती. या दोघांनी चाहत्यांची ही इच्छा अंतिम सामन्यात पूर्ण केली. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियाला 3-0 अशा फरकाने मालिका जिंकण्यापासूनही रोखलं. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 237 धावांचा पाठलाग करताना नॉट आऊट 121 रन्स केल्या. रोहितने विराटसह दुसऱ्या विकेटसाठी 168 रन्सची पार्टनरशीप केली आणि भारताला 9 विकेट्सने विजयी केलं.
रोहितला या कामगिरीसाठी डबल गिफ्ट देण्यात आलं. रोहितला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. रोहितची या मालिकेत ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. इतकंच नाही तर रोहित ‘मॅन ऑफ द सीरिज’चा मानकरी ठरला.
रोहितने या सामन्यानंतर केलेला सराव आणि घेतलेल्या मेहनतीबाबत भाष्य केलं. रोहितने सामन्यानंतर दिलेल्या खास मुलाखतीत त्याच्या या मेहनतीचा उल्लेख केला आहे. रोहितने काय म्हटलं हे जाणून घेऊयात.
रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी मुंबईत दादरमधील शिवाजी महाराज पार्कमध्ये काही तास बॅटिंगचा सराव केला होता. रोहितने दिलेल्या खास मुलाखतीत शिवाजी महाराज पार्कातील सरावाचा थेट उल्लेख केला नाही. मात्र रोहितने एकूणच सरावाबाबत भाष्य केलं. आता सरावाचा उल्लेख केल्यावर त्यात शिवाजी महाराज पार्कात केलेल्या प्रॅक्टीसचाही समावेश आलाच. त्यामुळे रोहितने त्याच्या या शतकी खेळीचं काही अंशी का होईना मात्र पार्कात केलेल्या सरावाला श्रेय दिल्याचं म्हटलं जात आहे. तसेच रोहितला पार्कातील प्रॅक्टीस लाभली, असा सूरही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
रोहित काय म्हणाला?
“मला या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करायचा होता. आपल्या अटींनुसार आणि स्वत:च्या पद्धतीने तयारी करायची होती. हा सराव माझ्यासाठी चांगला सिद्ध झाला. तसेच करियरमध्ये मला पुढे काय करायचंय हे मला समजलं. मी चांगली तयारी केली”, असं रोहितने या 7 महिन्यांच्या विश्रांतीदरम्यान केलेल्या सरावाबाबत म्हटलं.
रोहितने केलेल्या तयारीचा आणि ऑस्ट्रेलियातील याआधीच्या अनुभवाला या कामगिरीचं श्रेय दिलं. तसेच रोहितने स्वत:ला वेळ देणं किती महत्त्वाचा आहे यावरही भाष्य केलं.
“इथे येण्याआधी मी जी तयारी केली, त्याला मी हे श्रेय देतो. सर्वात आधी मी स्वत:ला वेळ दिला. स्वत:ला वेळ देणं महत्त्वाचं होतं कारण आपण प्रोफेशनली जे करतो, त्याव्यतिरिक्तही आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे”, असंही रोहित शर्मा याने नमूद केलं.