टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकता आली नाही. मात्र भारताने या मालिकेचा शेवट गोड केला. रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने केलेल्या खेळीच्या जोरावर भारताने तिसरा सामना हा 9 विकेट्सने खिशात घातला. भारताने ही मालिका 1-2 ने गमावली. त्यानंतर आता उभयसंघात 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेआधी मोठी अपडेट समोर आली आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शतक करणारा युवा खेळाडू टी 20I मालिकेत खेळणार की नाही? याबाबत अपडेट आली आहे.
टी 20I मालिकेआधी टीम इंडियाला नितीश कुमार रेड्डी याच्या दुखापतीमुळे चिंता आहे. नितीश खेळू शकणार की नाही? याबाबत प्रत्येक भारतीय चाहत्याला प्रतिक्षा आहे. नितीश वनडे सीरिजमधील पहिल्या 2 सामन्यात प्लेइंग ईलेव्हनचा भाग होता. मात्र नितीशला दुखापतीमुळे तिसर्या आणि अंतिम सामन्याला मुकावं लागलं होतं. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली होती. नितीशच्या या दुखापतीमुळे तो टी 20I मालिकेत खेळणार की नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
बीसीसीआयकडून आतापर्यंत नितीश कुमार रेड्डी याच्या दुखापतीबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही. क्रिकबझच्या वृत्तानुसार, नितीश आतापर्यंत फिट नाही. मात्र टी 20I मालिकेपर्यंत नितीश फिट होईल, असं म्हटलं आहे. त्यामुळे आता नितीश फिट व्हावा, अशीच आशा भारतीय चाहत्यांना आहे. टी 20I संघात आधीच हार्दिक पंड्या नाही. त्यात जर नितीशला दुखापतीमुळे खेळता आलं नाही तर भारतासाठी तो मोठा झटका असेल.
नितीशने गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत शतक झळकावलं होतं. नितीशने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मेलबर्न कसोटी सामन्यात शतक ठोकलं होतं. नितीशच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक होतं. तेव्हा नितीशने 114 धावांची खेळी केली होती.
दरम्यान वनडे टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्रेयसला सिडनीत तिसऱ्या सामन्यादरम्यान फिल्डिंग दरम्यान कॅच घेताना दुखापत झाली होती. त्यामुळे श्रेयसला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्रेयसला या दुखापतीमुळे जवळपास क्रिकेटपासून 3 आठवडे दूर रहावं लागणार आहे. त्यामुळे श्रेयस आता थेट मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजमध्येच खेळताना दिसू शकतो.