सध्या राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. भाजपने सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे ऑपरेशन लोट्स सुरु केले आहे. त्यांचे हे ऑपरेशन लोट्स यशस्वी झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलून टाकणारा हा मोठा घटनाक्रम आहे. येत्या बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेसमधील चार बड्या माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला खिंडार पडले आहे.
माढ्याच्या राजकारणात मोठा भूकंपमाढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दुध संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह शिंदे हे भाजपात प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या शिंदे यांनी अखेर भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी रणजित शिंदे यांचा ३० हजार मतांच्या फरकाने मोठा पराभव केला होता. या पराभवानंतर रणजित शिंदे यांनी आता भाजप पक्षात प्रवेश करून माढा मतदारसंघात नवी राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ते माढा मतदारसंघातील आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत भाजपमध्ये दाखल होत आहेत. रणजित शिंदे यांचा हा निर्णय माढ्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारा ठरला आहे.
रणजित शिंदे यांच्यासह मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने तसेच सोलापूर शहरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचाही भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. साधारण तीन ते चार माजी आमदार एकाच दिवशी भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या भाजपच्या हालचालींना बळ मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणारमाजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपचे स्थानिक आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. या विरोधामुळे दिलीप माने यांचा प्रवेश काही काळ अडकला होता. मात्र, पक्ष नेतृत्वाने यावर तोडगा काढत स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. अखेर, भाजप नेतृत्वाने स्थानिक विरोध झुगारून चारही माजी आमदारांचा पक्षप्रवेश निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप नेतृत्वाच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तसेच यामुळे विरोधी पक्षांना आगामी काळात मोठे आव्हान निर्माण होणार आहे.