कबुतरखान्यांसाठी जैन समाज पुन्हा आक्रमक, जैन मुनींचा थेट इशारा, आमरण उपोषण करणार
Tv9 Marathi October 28, 2025 12:45 AM

मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे जैन समाज आक्रमक झाला आहे. त्यातच आता जैन समाजाने एक मोठे पाऊल उचलले आहे. जैन मुनी निलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली येत्या ३ नोव्हेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, मुनी निलेश चंद्र विजय यांनी १ नोव्हेंबर रोजीच उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र मुंबई पोलिसांनी त्यांच्या या आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळे त्यांना तारीख पुढे ढकलावी लागली आहे.

जैन समाजाद्वारे पुकारण्यात येणाऱ्या १ नोव्हेंबरच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यामागे पोलिसांनी दोन कारणे दिली आहेत. यातील पहिले कारण म्हणजे १ नोव्हेंबर हा सुट्टीचा दिवस असल्याने कायदा व सुव्यवस्था राखणे अधिक आव्हानात्मक ठरू शकते. तसेच याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महाविकास आघाडी (MVA) यांनीही मतदार याद्या दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी मोर्चाची हाक दिली आहे. एकाच दिवशी दोन मोठ्या राजकीय पक्षांचे मोर्चे आणि जैन समाजाचे आंदोलन यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जैन मुनींच्या आंदोलनाला परवानगी नाकारली.

मागण्या काय?

जैन मुनी निलेश चंद्र विजय यांचे हे आमरण उपोषण केवळ कबुतरखान्यांच्या रक्षणासाठी नाही, तर ते व्यापक मागण्यांसाठी आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे. कबुतरांना दाणे टाकणे ही जैन धर्माच्या अहिंसेच्या तत्त्वाशी जोडलेली आणि धार्मिक श्रद्धेचा भाग असलेली परंपरा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबुतरखाने बंद झाल्याने अनेक कबुतरे दगावली असल्याचा त्यांचा दावा आहे.

यासोबतच त्यांनी मुंबईतील जैन मंदिरांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची मागणी केली आहे. तसेच गोवंश आणि गोरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी आवाज उठवला आहे. यासोबतच जैन प्रार्थनास्थळे, कबुतरखाने आणि गोरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

जैन समाजामध्ये प्रचंड नाराजी

दरम्यान मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे जैन समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. मुनी निलेश चंद्र विजय यांनी यापूर्वी “गरज पडल्यास शस्त्रे उचलू” असा इशारा दिला होता, ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. मात्र, आता त्यांनी शांततामय मार्गाने ‘आमरण उपोषणा’चे अस्त्र हाती घेतले आहे. १ नोव्हेंबरची परवानगी नाकारल्यानंतर आता ३ नोव्हेंबरपासून हे आंदोलन सुरू करण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे. या आंदोलनामुळे मुंबईतील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.