Ranji Trophy 2025: महाराष्ट्राचा संघ १७० धावांनी पुढे; चंडीगडला २०९ धावांवर रोखले
esakal October 28, 2025 12:45 AM

चंडीगड : महाराष्ट्राच्या संघाने रविवारचा दिवस गाजवला. ऋतुराज गायकवाडच्या ११६ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३१३ धावा फटकावलेल्या महाराष्ट्राच्या संघाने चंडीगडचा पहिला डाव २०९ धावांमध्ये गुंडाळला.

विकी ओत्सवाल याने ४० धावा देत सहा फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. महाराष्ट्राच्या संघाने रणजी करंडकातील ब गटातील लढतीत दुसऱ्या दिवसअखेरीस दुसऱ्या डावात बिनबाद ६६ धावा फटकावल्या असून आता हा संघ १७० धावांनी पुढे आहे.

चंडीगडने रविवारी आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली; पण त्यांना मोठी मजल मारता आली नाही. त्यांचा पहिला डाव २०९ धावांवर आटोपला. रमण बिश्नोईने ५४ धावांची आणि निषुंक बिर्लाने नाबाद ५६ धावांची खेळी केली. रमण बिश्नोई याने आपली खेळी तीन चौकार व एक षटकाराने सजवली. निषुंक बिर्ला याने दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ठसा उमटवला. रमण बिश्नोई व निषुंक बिर्ला यांनी नवव्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र - पहिला डाव ३१३ धावा. चंडीगड - पहिला डाव २०९ धावा महाराष्ट्र - दुसरा डाव बिनबाद ६६ धावा (पृथ्वी शॉ खेळत आहे ४१, अर्शिन कुलकर्णी खेळत आहे २५).

Ranji Trophy: अंजिंक्य रहाणेचं दीडशतक, मुंबई ४०० धावा पार; महाराष्ट्रासाठी विकी ओत्सवालच्या ६ विकेट्स, मिळवून दिली मोठी आघाडी पृथ्वी व अर्शीनची दमदार फलंदाजी

महाराष्ट्राने दुसऱ्या डावातही शानदार फलंदाजी केली. पृथ्वी शॉ व अर्शिन कुलकर्णी या सलामी जोडीने ११ षटकांमध्ये ६६ धावांची भागीदारी करताना चौफेर फटकेबाजी केली. पृथ्वी शॉ याने ३६ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह नाबाद ४१ धावा फटकावल्या आहेत. अर्शिन कुलकर्णीने ३० चेंडूंमध्ये तीन चौकारांसह नाबाद २५ धावांची खेळी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.