अमरावती : संपूर्ण कर्जमाफी देण्यास सरकारला बाध्य करावे, या उद्देशातून शेतकरी, दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूर येथे २८ ऑक्टोबरला ‘महाएल्गार’ मोर्चाचे आयोजन केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात हे आंदोलन पुकारण्यात आले असून, मुख्यमंत्र्यांची व सरकारची त्यांच्याच गृहनगरात कोंडी करण्याचा बच्चू कडू यांचा प्रयत्न आहे. या महाएल्गार आंदोलनात ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे अध्यक्ष विठ्ठलराजे पवार आदी सहभागी होणार आहेत.
बच्चू कडू यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना नागपुरातील परसोडी वर्धा रोड, जामठा येथील कापूस संशोधन केंद्राच्या बाजूच्या मैदानावर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. शेतमाल हमीभावापेक्षा कमी किमतीत विकावा लागतो.
शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचत नाहीत. शेतकरी आता अधिक कर्जबाजारी होत आहे, तरीही कर्जमाफीची योग्य वेळ येत नाही, हे दुर्दैव असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे. तीन हजार रुपयांनी सोयाबीन विकावे लागते, तर सहा हजार रुपयांनी कापूस विकावा लागतो, यावर कुणी बोलत नाही.
Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाक; बुलढाण्यात बच्चू कडू यांचा संतापशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुळापासून धोरणे बदलली पाहिजेत, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. गेल्या जून महिन्यात बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. शेतकरी कर्जमाफीसह विविध १७ मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते.