इंदापूर, ता. २६ : ‘‘कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण कल्पना आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याची गरज आहे. या क्षेत्रातील पदवीधरांनी ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे,’’ असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.
इंदापूर शहरातील वाघ पॅलेस येथे तालुका कृषी पदवीधर संघाने आयोजित केलेल्या पदवीधारकांच्या मेळाव्यात कृषिमंत्री भरणे बोलत होते. यावेळी बोलताना भरणे म्हणाले की, ‘‘सरकारच्या वतीने कृषी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना अनुदानात ट्रॅक्टर, शेती अवजारे मिळाली. राज्य आणि केंद्राच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. ते काम कृषी पदवीधरांनी करावे. त्यांच्या शिक्षणाचा फायदा कुटुंबापुरता मर्यादित ठेवू नये. योग्य बियाणे, खतांची, माहिती शेतकऱ्यांना द्यावी. ठिबक सिंचनासाठी मार्गदर्शन करावे.’’
याप्रसंगी यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, छत्रपती संभाजीनगर विभागाचे मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे आदी उपस्थित होते.
अमोल भिसे यांनी प्रास्ताविक, राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. गणेश सूर्यवंशी यांनी आभार मानले. मेळावा यशस्वितेसाठी हनुमंत बोराटे, मंगेश लोणकर, भरत हरणावळ, मोरेश्वर कोकरे, अजहर सय्यद आदींनी प्रयत्न केले.
इंदापूरमध्ये उभारणार मत्स्य व्यवसाय महाविद्यालय
तालुक्याला उजनी जलाशयाचा भागात मोठा नैसर्गिक साठा आहे. या माध्यमातून मासेमारी मोठ्या प्रमाणावर केली जाते. तालुक्याच्या दोन्ही बाजूला भीमा आणि नीरा नद्या आहेत. त्यामुळे इंदापूरमध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री भरणे यांनी दिली.