नाशिक: नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता कर्मचारी अहोरात्र अविरतपणे दक्ष असतात. या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य, आवास व आवश्यक शासकीय योजना राबविताना त्याचा लाभ देण्यासाठी यंत्रणांनी नियोजन करावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. २७) अध्यक्ष डागोर यांच्या अध्यक्षतेखाली सफाई कामगारांच्या समस्या व अडीअडचणी निवारणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत बैठक पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पालिका सहायक आयुक्त श्याम गोसावी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर कनोज, समाजकल्याणच्या सहायक लेखाधिकारी पूनम बेंडकुळे यांच्यासह नगर परिषदचे मुख्याधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
शेरसिंग डागोर म्हणाले, की नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे. या कर्मचाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहण्याच्या दृष्टीने वेळोवेळी आरोग्य तपासणी गरजेची आहे. त्यासाठी सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य विमा योजना राबवावी. सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध आवास योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध होतील, यासाठी सर्व नगर परिषदांनी कार्यवाही करावी.
‘समाजकल्याण’ने या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या योजनांची जनजागृती व प्रचार प्रसिद्धी विशेष शिबिरांच्या माध्यमातून करावी. मृत सफाई कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घेताना वारसा हक्क अबाधित राखून त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती द्यावी. शिक्षण विभागाने सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक व शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी करावी आदी सूचना डागोर यांनी केल्या.
Uran News: खवय्यांच्या खिशाला चाट! वादळी वाऱ्यामुळे बोटी बंदरात, प्रवासी वाहतुकही बंदजिल्हाधिकारी प्रसाद यांनी सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा मिळण्यासाठी १०० टक्के आयुष्मान कार्ड उपलब्धतेसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. मानधन तत्त्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना किमान वेतनासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रसाद यांनी दिले. तसेच, सफाई कर्मचाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्र उपलब्धतेसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.