दिवाळीनंतर दादरमधील गर्दी ओसरली!
esakal October 29, 2025 11:45 PM

दिवाळीनंतर दादरमधील गर्दी ओसरली!
दुकानांमध्ये सणानंतरचा निवांतपणा
प्रभादेवी, ता. २९ ः दिवाळी सणाच्या काळात दादर परिसरात खरेदीसाठी लोकांची गर्दी उसळली होती. पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. रस्तेही दिसेनासे झाले होते. दिवाळीनंतर मात्र ही गर्दी ओसरल्याचे दिसत आहे. दादरच्या गल्ल्या सुन्या पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
दादर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने इथे खरेदीसाठी तसेच इतर कामानिमित्त दादरमध्ये मुंबईच्या कानकोपऱ्यातून लोक येतात. सर्व काही एकाच ठिकाणी मिळत असल्याने दादर नेहमीच गजबजलेले असते.
दिवाळीनिमित्त गेल्या काही दिवसांपासून फुलबाजार, कपड्यांची दुकाने, मिठाईचे स्टॉल्स आणि रेल्वेस्थानक परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ दिसत होती. खरेदी, पूजा-सामग्री आणि भेटवस्तूंसाठी आलेल्या लोकांच्या गर्दीने दादरचा परिसर अक्षरशः गजबजून गेला होता. सणानंतर खरेदी कमी झाल्याने गर्दी ओसरली असून वाहतुकीचा ताणदेखील कमी झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. रेल्वेस्थानकांवरील नेहमीची प्रवासी संख्या परत आली असून फुलबाजार आणि मिठाई विक्रेत्यांनीही नेहमीचा व्याप पुन्हा सुरू केला आहे.
दादरमधील खाऊ गल्ल्यांमध्येही इतका ग्राहक नसल्याने दुकानदारांना थोडीशी उसंत मिळाल्याचे चित्र दिसत होते. सणानंतरचा हा निवांतपणा नागरिकांना आणि प्रशासनालाही काहीसा दिलासा देणारा ठरला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.