लोणावळा, ता. २९ : देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी लोणावळ्यात एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरातील विविध शाळांमधील तब्बल पाच हजार विद्यार्थी एकत्र येऊन ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन करणार आहेत. येत्या सात
नोव्हेंबर रोजी या उपक्रमाचे आयोजन शिवसेवा प्रतिष्ठान, मावळवार्ता फाउंडेशन, शिवदुर्ग मित्र, हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण, आयटीआय यांच्या संयुक्त विद्यमाने व लोणावळा नगर परिषद सहकार्याने करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी लोणावळा नगरपरिषदेसमोर विशेष मंच, ध्वनिव्यवस्था आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ मध्ये लिहिले. नंतर ते त्यांच्या प्रसिद्ध कादंबरी ‘आनंदमठ’ (१८८२) मध्ये प्रकाशित झाले. ‘वंदे मातरम’ हे स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणास्थान ठरले. सात नोव्हेंबर २०२५ मध्ये ‘वंदे मातरम’ या अमर राष्ट्रगीताला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राष्ट्रभक्तीपर उपक्रमांतून याचे स्मरण करण्यात येत आहे.
शहरातील सर्व शाळांतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार असून, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करणे हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, पालक आणि नागरिक उपस्थित राहणार असून, देशप्रेमाचा संदेश देणारा हा उपक्रम लोणावळ्याच्या इतिहासात नोंदला जाणार आहे. ‘वंदे मातरम’च्या गजराने संपूर्ण वातावरण भारून जाईल.