भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. फक्त टॅरिफच नाही तर भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध देखील तणावात आहेत. अमेरिकेने इतका मोठा टॅरिफ लावल्यानंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता एक मोठा दबाव भारतावर आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली नाही तर अत्यंत वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले. यासोबतच त्यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला स्पष्ट सांगितले की, ते रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत. मात्र, असा कोणताही संवाद झाला नसल्याचे भारताकडून सांगण्यात आले. आता यादरम्यानच भारताला मोठा झटका बसला.
रशियाहून भारतात कच्चे तेल घेऊन येणाऱ्या एका टँकरने बाल्टिक समुद्रात अचानक मार्ग बदलला आहे, ज्यामुळे भारत आणि रशियामधील तेल व्यापारात संभाव्य व्यत्यय येण्याची चिंता निर्माण झालीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाचे तेल भारतापर्यंत पोहोचले नाही पाहिजे, याकरिता डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहेत. रशियन तेल कंपन्यांवर अमेरिकेने नवीन निर्बंध लादल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात रशियन पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या भारतीय रिफायनरीजसाठी हा मोठा धोका असून यामुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे. 2022 नंतर भारताने यंदा पहिल्यांदा अमेरिकेकडूनही मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी केले. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, फुरिया नावाच्या जहाजाने रशियाच्या प्रिमोर्स्क बंदरातून तब्बल 7,30,000 बॅरल कच्चे तेल भरले होते आणि सुरुवातीला ते भारतातील गुजरातमधील सिक्का बंदरावर उतरवण्याचे नियोजन होते. मात्र, असे असताना देखील त्याचा अचानक रस्ता बदलण्यात आला.
हे जहाज डेन्मार्क आणि जर्मनीमधील फेहमार्न बेल्टवर पोहोचल्यावर आपला मार्ग बदलला. इजिप्तमधील पोर्ट सईद येथे नेले, नवीन अमेरिकेच्या निर्बंधांमुळे या प्रकार घडल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. सध्या असे दिसून येत आहे की, भारतात रशियन तेल आयात झपाट्याने कमी होऊ शकते. यामुळे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. रशियाकडून भारताचा कच्च्या तेलाचा पुरवठा पुढील काळात अस्थिर राहण्याची शक्यता आहे.