पुणे : ‘‘वाचनसंस्कृतीचा उत्सव बनलेला ‘पुणे पुस्तक महोत्सव’ आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुस्तक महोत्सव ठरला आहे. यंदाच्या महोत्सवात ‘लिटरेरी फेस्ट’, ‘लेखक कट्टा’ आदी उपक्रम तर आहेच, त्याशिवाय ‘जॉय ऑफ रीडिंग हे वेगळेपण असेल. वाचन संस्कृतीशी घट्ट वीण असलेल्या पुणेकरांना वाचन, साहित्य आणि संस्कृतीचा अद्वितीय संगम अनुभवता येणार आहे’’, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष युवराज मलिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
या महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष असून १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानात होणार आहे. यानिमित्ताने मलिक यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. याप्रसंगी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे उपस्थित होते.
पुस्तक महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांची रेलचेल असेल. यंदा या महोत्सवात तब्बल ८०० हून अधिक स्टॉल्स असतील. पुणेकरांच्या प्रतिसादामुळे या उपक्रमाने आज राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गेल्या वर्षी सुमारे आठ लाख पुणेकरांनी महोत्सवाला भेट देत २५ लाखांहून अधिक पुस्तकांची खरेदी केली होती. यंदाच्या नऊ दिवसांच्या महोत्सवात सहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १६, १७ आणि १८ डिसेंबरला मराठी भाषेतील कार्यक्रम रंगणार असून, १९, २० आणि २१ डिसेंबरला हिंदी, इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतील कार्यक्रम होणार आहेत. पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले हे कार्यक्रम वाचकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.
Ahilyanagar Crime: 'दोन गावठी पिस्तुलांसह कांगोणीत एकास अटक'; स्थानिक ‘गुन्हे अन्वेषण’ची कारवाईलेखक-प्रकाशकांसाठी ‘लिटरेरी फेस्ट’
या महोत्सवात ‘लिटरेरी फेस्ट’ आयोजित केला असून नवोदित लेखक, प्रकाशक आणि साहित्यप्रेमींना आपले विचार, कथा, कविता मांडण्यासाठी एक खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया ठेवली असून, सहभाग विनामूल्य आहे. यात देशातील २०० नामवंत लेखकांना भेटण्याची आणि त्यांचे विचार ऐकण्याची संधी वाचकांना मिळणार आहे.
लेखक कट्टा अन् चिमुकल्यांसाठी खास विभाग
यंदा महोत्सवात ‘लेखक कट्टा’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. लेखक ओळखपत्र असणाऱ्यांना येथे प्रवेश देण्यात येणार असून, या माध्यमातून लेखकांना एकमेकांशी संवाद साधण्याचे आणि नवे साहित्यिक सहकार्य निर्माण करण्याचे व्यासपीठ मिळेल. तसेच लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग तयार केला आहे. बालसाहित्य, कार्यशाळा आणि मनोरंजक उपक्रमांमुळे मुलांसाठी वाचनाचा आनंद द्विगुणित होईल.
खाद्यसंस्कृतीचा स्वाद, वाचकांसाठी सुविधा
महोत्सव परिसरात स्वतंत्र ‘फूड कोर्ट’ उभारण्यात येणार असून, महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद वाचकांना घेता येईल. मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या वाचकांसाठी प्रशस्त वाहनतळ व्यवस्था तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी इलेक्ट्रॉनिक वाहनांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
‘जॉय ऑफ रीडिंग’ पुरस्कार
यंदा ‘जॉय ऑफ रीडिंग’ या नावाने विशेष छायाचित्र स्पर्धा आणि पुरस्कार सोहळा होणार आहे. पुस्तक वाचणाऱ्याचे भाव टिपणाऱ्या उत्कृष्ट छायाचित्राला हा सन्मान प्रदान करण्यात येईल.