Rat29p12.jpg
01170
मंडणगड ः तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसलेले तळेघर येथील ग्रामस्थ.
तळेघर येथील ग्रामस्थांचे साखळी उपोषण
ग्रामस्थ एकवटले; जलयुक्तमधील कामांविषयीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २९ ः तालुक्यातील मौजे तळेघर येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधलेल्या तलावाच्या कामासाठीची सामग्री दर्जेदार नाही, असा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी आज भिंगळोली येथील तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.
तळेघर गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, म्हणून तलाव दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी वापरलेले सिमेंट व लोखंडी शिगा दर्जेदार नाहीत. हे काम करताना ग्रामस्थांनी काही सूचना केल्या होत्या. त्याचा विचारच केलेला नाही, तर याबाबत प्रशासकीय अधिकारीही तक्रारी ऐकून घेत नाहीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी माहितीच्या अधिकारातून या कामाविषयी माहिती मिळवली आहे.
सर्व प्रकाराबाबत पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता तसेच गटविकास अधिकारी मंडणगड यांच्याकडे तक्रार केली होती; परंतु कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयाला पूर्वसूचना देऊन साखळी उपोषण सुरू केला आहे.
या उपोषणात तळेघर फौजदारवाडी, मानेवाडी, पाटीलवाडी, करावडेवाडी येथील गणेश सार्वेडकर, चंद्रकांत जोंधळे, संजय करावडे, अनंत जाधव, शिवाजी घाटविलकर, गणेश निकम, बळीराम गोठल, गणेश साळवी, नामदेव साळुंखे, सुरेश पेडणेकर, नथुराम जाबरे, विनोद करावडे, काशीनाथ वास्कर, बबन गोठल, जयश्री पेडणेकर, सुप्रिया जोंधळे, सायली करावडे, अरूण रांगडे आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते. दरम्यान, पोलिस निरीक्षक नितीन गवारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रकाश शिगवण यांनी उपोषणस्थळास भेट देऊन ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत.