विवाहितेस पतीसह चौघांकडून मारहाण
हिर्लोक येथील प्रकार; कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः आपला पती, सासू, सासरे व दीर या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद हिर्लोक राणेवाडी येथील सविता वैभव बरगडे (वय ३५) हिने मंगळवारी (ता. २८) येथील पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी पती वैभव पांडुरंग बरगडे, सासू प्रतिज्ञा पांडुरंग बरगडे, सासरा पांडुरंग बरगडे व दीर प्रकाश पांडुरंग बरगडे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविता बरगडे हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे पती वैभव बरगडे कुडाळ येथे राहतात. सासू-सासरे, पती व दीर काही कारण नसताना वारंवार भांडण करून मारहाण करतात. याबाबत माहेरी कळविले होते. त्यावरून माहेरकडील लोकांनी सासू-सासरे, दीर व पती यांना विचारणा केली होती. तेव्हा त्यांनी माझी माफी मागितली होती. दरम्यान, २६ ऑक्टोबरला सकाळी पती वैभव कामावरून घरी आला. त्यावेळी मी केर-दोडामार्ग येथे माहेरी जायची असल्याने घरातील कामे आवरत होते. कामे आटोपून माहेरी जायला निघाले असताना पतीने, तू कोठेही जायचे नाही, माझ्या आईला कोणतेही काम सांगायचे नाही आणि स्वतः बसून खायचे नाही, असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुपारी अडीचच्या सुमारास काहीही कारण नसताना शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. त्यानंतर रात्री साडेआठला शिवीगाळ करून मंगळसूत्र तोडून टाकले. तसेच सासू-सासऱ्यांच्या मदतीने साडीला धरून ओढत घराबाहेर नेले. सासू-सासऱ्यांनी, पतीसह दिराने मारहाण केली. याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबतचा तपास आवळेगाव पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार समीर कोचरेकर करीत आहेत.