ratchl१४३.jpg-
O04353
श्रीनाथ खेडेकर
-----------
राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष
श्रीनाथ खेडेकरांचा राजीनामा
चिपळूण पालिकेसाठी उमेदवारी न मिळाल्याची खंत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः चिपळूण पालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहाराध्यक्ष श्रीनाथ खेडेकर यांनी आपल्या पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे पक्षातील अंतर्गत असंतोष बाहेर पडू लागला आहे. गेली २० वर्षे पक्षांसाठी राबूनही उमेदवारी देताना पक्षाने नवख्यांना संधी दिली. यातून व्यथित झालेल्या खेडेकरांनी पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा युवक जिल्हाध्यक्षांकडे सोपवला. दरम्यान, पक्षाचे नेते माजी आमदार रमेश कदमांवर नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजीनाम्याबाबत खेडेकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून मी पक्षाचे निष्ठेने काम करत आहे. राष्ट्रवादीत फूट पडली तरी मूळ पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला. पक्षबांधणीसाठी सातत्याने योगदान दिले. निवडणुकीच्या कालावधीत पक्षाच्या प्रत्येक उमेदवारासोबत आणि पक्षासोबत ठामपणे उभे राहून मेहनत घेत कार्यरत राहिलो. पक्षाला दिलेल्या योगदानाची दखल घेत त्याची पोचपावती द्यायची वेळ आली तेव्हा मात्र पक्षातील काही निवडक हेकेखोर मंडळींनी अन्यायकारक वागणूक दिली. केवळ अर्थकारणाला प्राधान्य देत राजकारण करत अन्यायकारक वागणूक दिली जात असेल तर ते सहन करणे शक्य नाही. राजीनामा दिला तरी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि आधारस्तंभ माजी आमदार रमेश कदम यांच्या विजयासाठी काम करणार आहे. पक्षाने प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरीही पक्षात नव्यानेच दाखल झालेल्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय योग्य नसल्याचे मत खेडेकर यांनी व्यक्त केले.