संगमेश्वर-टाकाऊ वस्तूतून शोधली रोजगाराची वाट
esakal November 15, 2025 02:45 PM

काही सुखद----लोगो

फोटो ओळी
-rat14p3.jpg - संगमेश्वर ः गोळवली येथील नितीन किंजळकरने तयार केलेल्या प्रतिकृती.
---------

टाकाऊ वस्तूतून शोधली रोजगाराची वाट

नितीन किंजळकरचा प्रेरणादायी प्रवास; कलापथकांना प्रतिकृतींचा पुरवठा

संगमेश्वर, ता. १४ ः संगमेश्वर तालुक्यातील गोळवली–किंजळकरवाडीतील नितीन किंजळकर या तरुणाने बेरोजगारीवर मात करत स्वतःचा वेगळा उद्योग शोधला आहे. शेतीतील अनिश्चितता, रानटी प्राण्यांचा वाढता त्रास आणि नोकरीच्या अपुऱ्या संधी या सगळ्या अडचणींवर नितीनने कल्पकतेच्या जोरावर उभारी घेतली.
शेजाऱ्यांच्या फ्रिजच्या पुठ्ठ्यातून तयार केलेले त्याचे पहिले प्रतिकृती चित्र पाहून गावकऱ्यांनी दिलेल्या शाबासकीने तो प्रेरित झाला. पुठ्ठा, फोम, लोखंडी सळ्या, रंगसाहित्य अशा टाकाऊ ते विकत मिळणाऱ्या साहित्यांपासून नितीन विविध प्राण्यांच्या प्रतिकृती तयार करू लागला. नमन लोककला आणि कलापथकांमधून जिल्हाभरातून मोर, कोंबडा, गरूड, लांडोर, गाय, उंदीर अशा प्रतिकृतींची मागणी वाढत गेली. आजपर्यंत त्याने सुमारे ३६ प्रतिकृती तयार करून विकल्या आहेत.
सुरवातीला सांगाडा सळी वेल्डिंगसाठी बाहेर वेल्डिंग शॉपला जावे लागायचे. मग तेही छोटे वेल्डिंग मशिन घेतले व घरासमोर अंगणात प्लास्टिक कापड टाकून छप्पर तयार केले व हे काम सुरू केले. दोन फूट उंच व चार ते पाच फूट लांब अशा साधारण मापाचे प्रतिकृती चित्र पूर्ण तयार करायला एक आठवडा लागतो. अशा पूर्ण तयार केलेल्या चित्रांचा मोबदला चांगला मिळत आहे. घराच्या अंगणात छोटे वर्कशॉप उभे करून नितीनने हे काम अधिक वेगाने सुरू केले. आवश्यक वेळी आपल्या वाडीतील मुलांना मजुरी देऊन तो रोजगारही उपलब्ध करून देतो.
-----
चौकट
भाऊ सचिनचीही मदत

नितीनसोबत त्याचा भाऊ सचिनही मेहनत करून मासेविक्रीचा व्यवसाय चालवतो. पहाटे चारला रत्नागिरी जेटीवर पोहोचून मासे खरेदी करून ते गावोगावी विकतो त्याशिवाय सणासुदीला पूजाअर्चेसाठी साहित्य, हारफुले तसेच मे–जूनमध्ये आंबा–फणसाचे स्टॉलही हे दोन्ही भाऊ लावतात. जिद्द, मेहनत आणि कोणतेही काम लाज न बाळगता करण्याची तयारी असेल तर बेरोजगारीवर मात करता येते, हे नितीन आणि सचिन या दोघांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
----
चौकट
चित्रांना मोठी मागणी

विविध प्रकारचे साहित्य पुठ्ठा, वेल्वेट कापड, फोम, साधे कापड, विविध कलर लेस, टिकल्या, रंगसाहित्य, फेव्हिकॉल तर सांगाडा तयार करण्यासाठी लोखंडी सळ्या अशा टाकाऊ व विकत वस्तू मिळवल्या. कोकणात अजूनही नमन लोककला, कलापथक उत्तमप्रकारे चालू असल्याने अशा मंडळींनी रत्नागिरी जिल्हाभरातून कोंबडा, गरूड, मोर, लांडोर, गाय, उंदीर अशा प्रकारच्या प्रतिकृती चित्रांची मागणी येण्यास सुरवात झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.