IND vs SA, 1st Test: पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी राखलं वर्चस्व, द. आफ्रिकेला केलं ऑलआऊट; पण नंतर जैस्वाल स्वस्तात बाद
esakal November 15, 2025 02:45 PM
  • भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखले.

  • दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दोन सत्रात सर्वबाद केले.

  • मात्र, यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात कसोटी मालिका सुरू झाली असून पहिला सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स मैदानात खेळला जात आहे. पण हिवाळा सुरू झाला असल्याने लवकर अंधार पडत असल्याने पहिला दिवस लवकर थांबवला.

दरम्यान, पहिल्या दिवसावर भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी पहिल्या दोन सत्रात दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद केले होते. त्यानंतर तिसऱ्या सत्रात भारतीय संघ फलंदाजीला उतरला होता. भारताने पहिला दिवस संपला, तेव्हा २० षटकात १ बाद ३७ धावा केल्या.

IND vs SA, 1st Test: बुमराहचा कोलकातामध्ये जलवा! 5 विकेट्स घेत दिग्गजांच्या यादीत सामील; नोंदवले तीन मोठे विक्रम

भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी डावाची सुरुवात केली होती. या दोघांनीही संयमी सुरुवात केली होती. कारण भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनाही खेळपट्टीकडून मदत मिळत होती. पण ७ व्या षटकात मार्को यान्सिनने १२ धावांवर यशस्वी जैस्वालला त्रिफळाचीत केले.

पण नंतर केएल राहुलला वॉशिंग्टन सुंदरची चांगली साथ मिळाली. या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत विकेट जाऊ दिली नाही. केएल राहुल ५९ चेंडूत १३ धावांवर नाबाद आहे, तर वॉशिंग्टन सुंदर ३८ चेंडूत ६ धावांवर नाबाद आहे.

तत्पुर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्करम आणि रायन रिकल्टन यांनी सलामीला ५७ धावांची भागीदारी करत सुरुवात चांगली केली होती. पण रिकल्टन २३ धावांवर बाद झाला, तर मार्करम ३१ धावांवर बाद झाला.

त्यानंतर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांच्या माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज फार काही करू शकले नाहीत. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचीही बुमराह, कुलदीप आणि सिराजला साथ मिळाली.

दक्षिण आफ्रिकेकडून विआन मुल्डर (२४) आणि टोनी डी झोर्झी (२४) यांनीही सुरुवात चांगली केली, पण ते मोठी खेळी करू शकले नाहीत. ट्रिस्टन स्टब्स ७४ चेंडूत १५ धावांवर नाबाद राहिला. पण त्याला बाकी कोणाचीच भक्कम साथ मिळाली नाही.

IND vs SA मालिका कुलदीप यादव अर्ध्यावर सोडणार? BCCI कडे मागितलीये सुट्टी, कारण घ्या जाणून

भारताकडून जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यावव यांनी २ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने १ विकेट घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.