राजधानी दिल्लीतील स्फोटाचा (Delhi Blast) कट रचणारी दहशतवादी संघटना जै श-ए-मोहम्मदचे फरीदाबाद मॉड्यूल उघड झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांच्या हाती बरीच महत्वाची माहिती लागली आहे. या मॉड्यूलची सर्वात प्रमुख सदस्य डॉ. शाहीन ही फक्त पाकिस्तानच्या संपर्कात नव्हती तर तिने उत्तर प्रदेशात काम करणाऱ्या 30 ते 40 डॉक्टर्सनाही आपल्या नेटवर्कशी जोडण्याचा प्रयत्न केला होता अशीही खळबळजनक माहिती उघड झाली होती. एवढंच नव्हे तर संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये काम करणारे काश्मीरी वंशाचे सुमारे 200 डॉक्टर्स आणि मेडिकल छात्र आता एजन्सीच्या रडारवर आहेत. देशभरात अशा संशयास्पद प्रोफाइलची संख्या 1 हजारपेक्षा पेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.
पाकिस्तानी सेनेचा डॉक्टरशी संपर्क
एनआयए, आयबी, दिल्ली पोलिस आणि एटीएसच्या संयुक्त तपासात असे दिसून आले की डॉ. शाहीनने तिचे नेटवर्क पाकिस्तान, मलेशिया, तुर्की, यूएई, मालदीव आणि बांगलादेशमध्ये पसरवले होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. श्रीनगरमध्ये तिच्या चौकशीत असे दिसून आले की ती एका पाकिस्तानी लष्करी डॉक्टरच्या संपर्कात होती. दिल्लीत मोठे बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर तिने परदेशात पळून जाण्याची योजना आखली होती, ज्यासाठी तिने व्हिसासाठी अर्जही केला होता, असंही एन्जन्सीजच्या तपासात उघड झाल्याची माहिती समोर आली आहे.
या मॉड्यूलचे इतर सदस्य, डॉ. आदिल, डॉ. परवेझ, डॉ. आरिफ आणि डॉ. फारूक हे देखील ताब्यात आहेत. त्या सर्वांची सतत चौकशी केली जात आहे. एटीएसची एक टीम दिल्लीत तैनात आहे आणि नेटवर्क मुळापासून नष्ट करण्यासाठी श्रीनगरला दुसरी टीम पाठवण्याची तयारी सुरू आहे
कसं झालं ब्रेनवॉश ?
तपासात असेही समोर आले की डॉ. शाहीनने तिचा भाऊ डॉ. परवेझला कट्टरपंथी बनवले. तो 2021 मध्ये मालदीवलाही गेला होता, परंतु नंतर शाहीनने त्याचे ब्रेनवॉश केले आणि त्याला मॉड्यूलचा सक्रिय सदस्य बनवले. शस्त्रं खरेदी करणे आणि नेटवर्कशी जोडलेल्या डॉक्टरांना संदेश पोहोचवणे अशी कामं परवेझला सोपवण्यात आली होती. तो ट्रेस होऊ नये तसेच बॅटरी जास्त काळ चालावी यासाठी शहीहने त्याला जुना कीपॅड असलेला मोबाईल फोन वापरण्यास सांगितलं होता अशीही माहिती उघड झाली आहे.
दिल्ली आणि धार्मिक स्थळांवर हल्ल्याचा मोठा प्लान
हे संपूर्ण मॉड्यूल चार वर्षांपासून तयार करण्यात येत होतं अशीही माहिती चौकशी दरम्यान समोर आली. दिल्ली आणि इतर धार्मिक स्थळं ही त्यांच्या निशाण्यावर होती. अधिकाऱ्यांच्या मते, जैश-ए-मोहम्मद त्यांच्या कारवायांसाठी सुशिक्षित व्यावसायिकांवर अवलंबून असते, म्हणून या मॉड्यूलमध्ये डॉक्टर आणि विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे सुरक्षा एजन्सी या नेटवर्कवर आपली पकड घट्ट करत आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये सतत माहितीची देवाणघेवाण केली जात आहे. सध्या, संपूर्ण मॉड्यूल उध्वस्त करण्यासाठी अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.