Test Cricket : कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 12 जाहीर, स्टार खेळाडूचं टीममध्ये कमबॅक
GH News November 19, 2025 08:12 PM

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना गुवाहाटीत 22 नोव्हेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला 21 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याला दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकावं लागणार आहे. त्यामुळे स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचं पहिल्या कसोटीत नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा पर्थमध्ये होणार आहे. या सामन्याच्या 48 तासांआधी इंग्लंडने 12 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.

मार्क वूड याचं कमबॅक

इंग्लंडने या 12 खेळाडूंमध्ये मार्क वूड याला संधी दिली आहे. मार्क वूड याचं इंग्लंड संघात कमबॅक झालं आहे. त्यामुळे मार्क वूड प्लेइंग ईलेव्हनचा भाग असणार, हे निश्चित समजलं जात आहे. वूडने त्याचा अखेरचा कसोटी सामना हा ऑगस्ट 2024 मध्ये खेळला होता. त्यानंतर वूडला अनफिट असल्याने इंग्लंड टीमपासून दूर रहावं लागलं.

तसेच जोफ्रा आर्चर, ब्रायडन कार्स आणि गस एटकीन्सन यांचाही 12 खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तिघांवर वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे. तर स्पेशालिस्ट स्पिनर म्हणून शोएब बशीर याचा समावेश करण्यात आला आहे. तर कॅप्टन बेन स्टोक्स हा देखील चौथा वेगवान गोलंदाज असणार आहे.

ओपनिंग कोण करणार?

झॅक क्रॉली आणि बेन डकेट हे दोघे सलामीला येऊ शकतात. तसेच झॅक क्रॉली, ओली पोप, जो रुट आणि कॅप्टन बेन स्टोक्स यांच्यावर मिडल ऑर्डरची जबाबदारी असणार आहे. आता इंग्लंड टीम मॅनेजमेंट प्लेइंग ईलेव्हनसाठी कोणत्या एकाला डच्चू देणार? हे येत्या काही तासांत स्पष्ट होईल.

दरम्यान उभयसंघात आयोजित एशेस सीरिज ही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीअंतर्गत खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका प्रतिष्ठेची अशी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोघांपैकी कोणता संघ पर्थमध्ये सामना जिंकून विजयी सलामी देणार? याकडे क्रिकेट चाहत्यांंचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडची 12 सदस्यीय संघ : बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ब्रायडन कार्स, मार्क वुड, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर आणि गस एटकिन्सन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.