भारताचा माजी कर्णधार आणि हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित शर्माने कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित शर्मा आता फक्त वनडे मालिका खेळत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळला होता. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. असं असताना आयसीसी वनडे क्रमवारीत रोहित शर्माला मोठा धक्का बसला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून पहिल्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्माची घसरण झाली आहे. ताज्या क्रमवारीत रोहित शर्माने पहिलं स्थान गमावलं आहे. त्याची जागा आता न्यूझीलंडचा मधल्या फळीतील फलंदाज डॅरेल मिचेलने घेतली आहे. डॅरेल मिचेल 782 रेटिंग पॉइंटसह पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा त्याच्यापेक्षा फक्त एका क्रमाने मागे आहे. डॅरेल मिचेल यापूर्वी तिसऱ्या स्थानावर होता. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध जबरदस्त कामगिरी केल्याने रोहित शर्मा आणि इब्राहिम जाद्रान यांना मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे.
आयसीसी वनडे क्रिकेट क्रमवारीच्या इतिहासात 47 वर्षानंतर असा बदल पाहायला मिळत आहे. 47 वर्षानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजाने पहिलं स्थान पटकावलं आहे. यापूर्वी 1979 मध्ये ग्लेन टर्नरने आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं होतं. त्यानंतर आता डॅरेल मिचेलने ही कामगिरी केली आहे. डॅरेल मिचेल न्यूझीलंडच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो. त्याने आतापर्यंत खेळलेल्या वनडे सामन्यात 53.12 च्या सरासरीने 2338 धावा केल्या आहेत. यात सात वनडे शतकांचा समावेश आहे. डॅरेल मिचेल सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने या वर्षात खोऱ्याने धावा काढल्या आहेत. आतापर्यंत खेळलेल्या 16 डावात त्याने 54.35 च्या सरासरीने 761 धावा केल्या आहेत. यचात एक शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहित शर्माकडे पुन्हा नंबर एक होण्याची संधी आहे. यासाठी त्याला दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेची वाट पाहावी लागणार आहे. वनडे मालिकेसाठी भारतीय संघ काही जाहीर केलेला नाही. पण रोहित शर्मा या संघात असेल यात काही शंका नाही. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली होती. दक्षिण अफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत नंबर 1 स्थान गाठणं त्याला सोपं होणार आहे. यासाठी त्याला तिन्ही सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल, तरच पहिलं स्थान गाठेल.