टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी सर्वच 20 संघांची जोरदार तयारी सुरु आहे. 7 फेबुवारी ते 8 मार्च दरम्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. हा वर्ल्डकप भारत आणि श्रीलंकेत होणार असल्याने गजविजेत्या टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धेच्या वेळापत्रकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारतीय संघ कोणत्या गटात असेल? कधी सामने होतील? वगैरे प्रश्न पडले आहेत. भारत पाकिस्तान सामना होईल की नाही? कारण दोन्ही संघ फक्त मल्टीनेशन स्पर्धेतच एकमेकांसमोर उभे ठाकत आहेत. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ भिडण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार, टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. तसेच त्याची संभाव्य तारीख समोर आली आहे. पण त्यावर अधिकृतरित्या मोहोर लागलेली नाही.
रेवस्पोर्ट्जच्या रिपोर्टनुसार, टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि युएसए यांच्यात पहिला सामना होण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होईल. म्हणजेच साखळी फेरीत भारत, पाकिस्तान, युएसए हे संघ एका गटात असण्याची शक्यता आहे. 20 संघांना प्रत्येकी पाच-पाच अशा चार गटांमध्ये विभागले जाईल. भारत पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. संभाव्य वेळापत्रक पाहता भारत पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबोत होणार आहे. कोलंबोतील दोन स्टेडियम टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी राखून ठेवण्यात आले आहे. त्यापैकी कोणत्या मैदानात हा सामना होईल हे मात्र त्या रिपोर्टमध्ये नाही.
रिपोर्टनुसार, भारताने उपांत्य फेरी गाठली तर 5 मार्च 2026 रोजी वानखेडे स्टेडियमवर हा सामना होईल. तर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल. पण हा सामना पाकिस्तानच्या स्थितीवर अवलंबून असेल. जर पाकिस्तानने अंतिम फेरी गाठली तर हा सामना कोलंबोत होईल. पाकिस्तानी संघ सेमीफायनल आणि नंतर फायनलमध्ये पोहोचला तर दोन्ही सामने श्रीलंकेत खेळले जातील. श्रीलंकेचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला तर हा सामना कोलंबोत होईल. पाकिस्तान किंवा श्रीलंका अंतिम चारमध्ये पोहोचले नाही तर दोन्ही सेमीफायनल आणि अंतिम सामना भारतात खेळला जाईल.