अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या अनेक दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात उल्हासनगर येथील १७ वर्षीय सुमित चेलानी याचा मृत्यू झाला आहे. यामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बहिणीच्या लग्नाची तयारी आणि आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पार्ट-टाईम डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या सुमितचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला.
नेमकं काय घडलं?सुमित हा उल्हासनगरातील एका हार्डवेअर दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. कुटुंबाला हातभार लागावा आणि बहिणीच्या लग्नासाठी काही पैसे साठवता यावेत, यासाठी तो दिवसरात्र झटत होता. १८ नोव्हेंबरला सायंकाळी सुमित इलेक्ट्रिक दुचाकीवरून माल घेऊन अंबरनाथकडे जात होता. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण चौबे यांच्या भरधाव वेगात असलेल्या कारने त्याला आणि इतर दुचाकीस्वारांना तसेच पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सुमित लांब फेकला गेला आणि त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
सुमितच्या निधनामुळे त्याच्या गरीब कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. ज्या बहिणीच्या लग्नाची तजवीज करण्यासाठी तो जीवापाड मेहनत करत होता, तिच्या डोळ्यादेखत भावाचे पार्थिव पाहण्याचे दुर्भाग्य ओढवले आहे. सुमितचे शेजारी सनी मलकानी यांनीही याबद्दल हळहळ व्यक्त केली. सुमितच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत आहे. सुमितच्या कुटुंबाला सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी कळकळीची विनंती आहे. तसेच या घटनेबद्दल प्रचंड दु:ख होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकूण चार जणांचा मृत्यूहा भीषण अपघात किरण चौबे हे संघटनेच्या सभेसाठी जात असताना झाला. अपघातानंतर चौबे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालवणाऱ्या लक्ष्मण शिंदे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या अपघातात सुमित चेलानीसह चालक लक्ष्मण शिंदे, अंबरनाथ महानगरपालिकेचे दोन कर्मचारी आणि एक पादचारी नागरिक अशा एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेले उमेदवार किरण चौबे यांना तातडीने कल्याणच्या फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात अपघाताचा संपूर्ण थरार कैद झाला आहे. अपघातानंतर पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अंबरनाथ पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत अनेक जणांचे जबाब नोंदवले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.