मंचर, ता. २२ : लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल येथे गुरुवार (ता. २०) ते शनिवारपर्यंत (ता. २२) ॲथलेटिक मीट स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी कवायत, तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब व योगा, तर सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी लेझीम सादर केली.
तसेच पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी हिप-हॉप नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या क्रीडा महोत्सवात धावणे, पोहणे, ट्रॅक ॲण्ड फिल्ड तसेच इतर विविध स्पर्धांमध्ये एकूण एक हजार ८०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. भैरवनाथ संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्कूलचा कर्णधार विहान सांडभोर व उपकर्णधार दीप गुजराथी याने उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. सांडभोर याने सर्व विद्यार्थ्यांना शिस्त व नियम पालनाची शपथ दिली.
विद्यार्थ्यांना क्रीडाशिस्त, खेळांचे महत्त्व व नियमित सरावाचे उपयुक्त पैलू याबाबत मार्गदर्शन प्राचार्या शबनम मोमीन यांनी केले. यावेळी संस्थेच्या प्रशासनाधिकारी प्रा. श्यामल चौधरी, मुख्याध्यापक राजू आढळराव, प्राचार्य डॉ. संजय चौधरी, उपप्राचार्या रजनी बाणखेले व डेक्कन मराठा कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्सचे प्राचार्य सुनील गावशेते आदी उपस्थित होते. कृतिका बनसोड व सोनिया पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले.