जपानमधील भूकंप: उत्तर जपानमध्ये सोमवारी उशिरा ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, त्यात ३० लोक जखमी झाले. प्रशांत महासागराच्या किनारी भागात त्सुनामी आली. भूकंपानंतर अनेक छोटे-मोठे हादरे बसले. जपानच्या हवामान संस्थेने संभाव्य 'महान भूकंप'चा इशारा दिला आहे. वृत्तानुसार, जपान सरकार अजूनही त्सुनामी आणि रात्री उशिरा झालेल्या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करत आहे.
जपानच्या मुख्य होन्शु बेटावरील सर्वात उत्तरेकडील प्रीफेक्चर, आओमोरीच्या किनाऱ्यापासून सुमारे 80 किलोमीटर (50 मैल) अंतरावर प्रशांत महासागरात रात्री 11:15 वाजता भूकंप झाला. भूकंपानंतर सततच्या धक्क्यांमुळे लोक घाबरले आहेत.
पंतप्रधान ताकाईची यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांना सांगितले की, सुमारे 30 जण जखमी झाले आहेत. आत्तापर्यंत ही संख्या 33 पर्यंत वाढली आहे. त्याच वेळी, जपान हवामान संस्थेने सांगितले की, ओमोरीच्या दक्षिणेकडील इवाते प्रीफेक्चरमधील इकुजी बंदरात 70 सेंटीमीटर (2 फूट, 4 इंच) पर्यंतची सुनामी मोजली गेली आणि इतर किनारी समुदायांमध्ये 50 सेंटीमीटरपर्यंत मोजली गेली. भूकंपामुळे होक्काइडोच्या न्यू चिटोस विमानतळावर सुमारे 200 प्रवासी रात्रभर अडकून पडले होते.